सकाळ डिजिटल टीम
अभिनव आणि नवोन्मेषी उपक्रमांना सातत्याने पाठबळ देणारे शिवाजी विद्यापीठ (Shivaji University) आता खऱ्याखुऱ्या मोत्यांची शेती (Pearl Farming Kolhapur) पिकविण्यास सिद्ध झाले आहे.
विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागाने घेतलेल्या पुढाकारातून गोड्या पाण्यातील मोती संवर्धन, संशोधन आणि उत्पादन केंद्राचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
कुलगुरू डॉ. शिर्के यांना सडोली दुमाला येथील मोती उत्पादक व प्रशिक्षक दिलीप कांबळे यांच्याविषयी माहिती समजल्यानंतर त्यांनी प्राणीशास्त्र अधिविभागाला त्यांच्याशी संपर्क साधून अशा प्रकारचे प्रशिक्षण केंद्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी उभारण्याविषयी चाचपणी करण्याची सूचना केली होती.
त्यानुसार विद्यापीठात हे मोती पिकविणारे केंद्र श्री. कांबळे यांच्याच सहकार्यातून उभे राहिले आहे. विभागातील प्राणीशास्त्रज्ञ डॉ. नितीन कांबळे हे त्याचे समन्वयक म्हणून काम पाहात आहेत.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ‘प्राणीशास्त्र विभागातील रेशीमशेतीचा ‘सॉईल टू सिल्क’ प्रकल्प, फुलपाखरू उद्यान आणि अलिकडच्या काळात सुरू केलेला शोभेच्या मत्स्यउत्पादनाचा प्रकल्प ही याची काही उदाहरणे आहेत.
आपल्या विभागातील विद्यार्थी आणि नागरिक यांना सगळे समुद्रीजीव एकाच ठिकाणी पाहता येतील, अशा पद्धतीचे भव्य मत्स्यालय उभारण्याचा मनोदय आहे. आज कार्यान्वित करण्यात आलेले गोड्या पाण्यातील मोत्यांच्या उत्पादन व संशोधनाचे केंद्र हे या मालिकेतील महत्त्वाचे पाऊल आहे.
ही मोत्यांची शेती विद्यापीठ पैशांसाठी करीत नसून ज्ञानसंवर्धनासाठी करीत आहे. पर्ल फार्मिंग या विषयाचा आपल्या अभ्यासक्रमात समावेश करावा आणि किमान दरवर्षी काही उद्योजक (Business), व्यावसायिक आपल्या विद्यार्थ्यांमधून निर्माण व्हावेत, अशा प्रकारे त्यांना प्रशिक्षित करावे, असेही कुलगुरू यांनी स्पष्ट केले.