Pranali Kodre
गुरुवारी (३१ ऑक्टोबर) इंडियन प्रीमियर लीग २०२५ लिलावापूर्वी सर्व फ्रँचायझींनी संघात रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली.
चेन्नई सुपर किंग्सने माजी कर्णधार एमएस धोनीला अनकॅप खेळाडू म्हणून ४ कोटी रुपयांना संघात रिटेन केले आहे. धोनीसाठी चेन्नईने अनकॅप खेळाडूचा नियम वापरला आहे.
या नियमानुसार खेळाडूने ५ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नसेल, तर त्या खेळाडूला अनकॅप खेळाडू समजले जाऊ शकते.
या नियमानुसार धोनीने जुलै २०१९ नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेलं नसल्याने त्याला अनकॅप खेळाडू समजण्यात आलं.
खरंतर आयपीएलच्या सुरुवातीपासून हा नियम होता. परंतु २००८ पासून २०२१ पर्यंत कोणत्याच संघाने या नियमाचा वापर केला नव्हता. अखेर २०२१ मध्ये हा नियम काढून टाकण्यात आलेला. परंतु, आयपीएल २०२५ लिलावापूर्वी पुन्हा हा नियम लागू करण्यात आला.
पुन्हा नियम लागू होताच केवळ चेन्नई सुपर किंग्सनेच नाही, तर राजस्थान रॉयल्सनेही त्याचा फायदा घेतला आहे.
राजस्थान रॉयल्सने गोलंदाज संदीप शर्मा याला अनकॅप खेळाडू म्हणून ४ कोटी रुपयात कायम केले आहे. त्याने राजस्थानसाठी गेल्या हंगामात चांगली कामगिरी केली आहे.
संदीप शर्माने जुलै २०१५ मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. पण त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत झिम्बाब्वेविरुद्ध दोनच टी२० सामने खेळला. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाही.
त्यामुळेच संदीप हा देखील अनकॅप खेळाडूचा नियमात बसत असल्याने त्याच्यासाठी राजस्थानने या नियमाचा वापर केला.