अभिजित खुरासणे
Mahabaleshwar Birds Sammelan : महाबळेश्वर परिसरात सध्या विविध पक्ष्यांचे संमेलन भरले आहे.
पक्षी निरीक्षक व अभ्यासकांना निसर्ग खुणावू लागला आहे. पक्ष्यांचा किलबिलाट पक्षीप्रेमी, पर्यटकांना मंत्रमुग्ध करत आहे.
सध्या जंगल भागात काही प्रमाणात पाणीटंचाई जाणवू लागल्याने प्राणी, पक्षी, श्वापदे हे शहराकडे किंवा मुख्य रस्त्यांवर दर्शन देत असल्याचे चित्र दिसत आहे.
जंगलातील वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक, फुलपाखरू यांचा अभ्यास करण्यासाठी पर्यावरणप्रेमींसाठी ही संधीच उपलब्ध झाली आहे.
महाबळेश्वरमध्ये सरासरी ४०० हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती पाहावयास मिळतात.
सध्या मार्च ते मेदरम्यान पक्षी व प्राणी निरीक्षणासाठी हा काळ महत्त्वाचा मानला जातो.
महाबळेश्वरात स्वर्गीय नर्तक, काळटोप कस्तुर, नारंगी डोक्याचा कस्तुर, निलगिरी रान पारवा, पांढऱ्या पोटाचा नर्तक, कुर्टुक, तांबूला (रेड ब्रेस्टेड फ्लाय कॅचर), जांभळ्या पट्ट्याचा शिधिर, नीलमणी, काळोखी, शिपाई, बुलबुल असे पक्षी आले आहेत.