Sandip Kapde
जगदीश त्र्यं. मोरे : मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला `वर्षा` बंगला हा कायम महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय असतो. मुळात तो बंगला पूर्वी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान नव्हते आणि त्याचे नावही वर्षा नव्हते.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी 20 फेब्रुवारी 1975 रोजी मुख्यमंत्री पदावरून पायऊतार झाले आणि त्यांचा एकोणवीस वर्षांचा वर्षा बंगल्यावरील प्रदीर्घ रहिवास संपुष्टात आला.
त्यांच्या हितचिंतकांपैकी कोणीतरी त्यांना सहज म्हणाले, साहेब, बंगला सोडण्याची एवढी घाई का करता? थोडे दिवस थांबा कदाचित तुम्हाला पुन्हा निमंत्रण येईल...
बोलणाऱ्याच्या मनातील निर्मळ भावना लक्षात घेऊन नाईक म्हणाले, आता ते होणे नाही... आता कोणी आग्रह केला तरी माझा बेत बदलणार नाही आय हॅव प्लेड माय इनिंग फॉर अ हेअरली लाँग पिरिय्ड. आय वॉज ऑन द ग्राऊंड. आता पुरे!
नाईक यांच्या दूत पर्जंन्याचा या चरित्रातील हा संवाद महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याचं स्थानमहत्व अधोरेखित करतो. प्रसिद्ध साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी हे चरित्र लिहिलं आहे. ते मुख्यमंत्र्यांचे प्रसिद्धी अधिकारी म्हणून ते काम पाहत असत.
कर्णिक यांनी दूत पर्जन्यांद्वारे नाईक यांच्या जीवनाचे विविध पैलू उलगडून दाखविले आहेत. त्यातच वर्षा बंगल्याचं कूळ आणि मूळही लक्षात येतं. नाईक मुख्यमंत्री होईपर्यंत हा बंगला कधीच मुख्यमंत्र्यांचा नव्हता आणि ते द्विभाषिक राज्याचे मंत्री होईपर्यंत त्याचे नावही वर्षा नव्हतं.
नाईक कृषिमंत्री झाले आणि त्यांच्या वाट्याला मंत्री म्हणून डग बीगन नावाचा इंग्रजी आमदानीतला बंगला आला. सरकारनं दिला तो बंगला त्यांनी स्वीकारला.
ते मुळातच हौशी स्वभावाचे होते. त्यांच्या पत्नी वत्सलाबाईंनाही टापटीपीनं राहण्याची आवड होती. तसा हा बंगला अगदीच साधा होता. बैठी बांधणी, सगळीकडून मोकळे दरवाजे आणि खासगीपणा नाही.
वत्सलाबाईंना क्षणभर वाटलं, सर्वांनी नाकारलेला हा बंगला आपल्या वाट्याला तर आला नाही ना? शेजारचा मुख्यमंत्र्यांचा सह्याद्री हा बंगला केवढा भव्य! त्याच्या मागील सौधावर उभं राहिलं की मरीन लाईन्सचा नेकलेस ऑफ बाँम्बे क्वीन कसा रात्री झगमगतांना दिसतो.
चौपाटीवर समुद्राच्या लाटा कशा उसळतांना दिसतात. त्याच्या विस्तीर्ण आवारात कशी सुंदर झाडं आहेत. त्याची बाग किती सुरेख आहे! त्या मानानं डग बीगन अगदीच साधा आहे.
नाईक म्हणाले, छान आहे हे घर. याला एक घरंदाजपणा आहे. ते खरंच होतं. वर्षा बंगल्यामध्ये येणाऱ्या अभ्यगताला परकेपणा वाटेल, अशी औपचारिकता नव्हती. त्याला घराचा मोकळेपणा होता. मुलगा अविनाशच्या वाढदिवशी 7 नोव्हेंबर 1956 रोजी नाईक कुटुंब डग बीगनवर राहायला आले.
नाईक यांचा पाऊस हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. कवी पांडुरंग श्रावण गोरे यांची ‘शेतकऱ्यांचे गाणे’ ही अत्यंत आवडीची कविता होती. त्यामुळे आल्या दिवशीच श्री. नाईक यांनी डग बीगनचं नामांतर वर्षा असं केलं. वर्षाच्या आवारात त्यांनी आंबा, लिंब, सुपारी आदी विविध झाडे लावली. ते माळ्याला म्हणायचे, मी झाडं लावीन ती माझ्यासाठीच आहेत, असं समजू नकोस. पुढील काळात ती कुणालाही उपयोगी पडायला हवीत.
मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या आकस्मिक निधनानंतर नाईक यांच्यावर राज्याची जबाबदारी आली. 5 डिसेंबर 1963 रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांबरोबर पहिली बैठक संपवून नाईक वर्षा बंगल्यावर आले. तेव्हा त्यांचे मोठे बंधू बाबासाहेब त्यांची वाट पाहत होते.
ते म्हणाले, शेवटी या वर्षा बंगल्यालाच मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून नाव लौकीक मिळणार असं दिसतं. “होय, बाबासाहेब! छप्पन्न साली आम्ही आपल्या मोठ्या बाबाच्या- अविनाशच्या सहाव्या वाढदिवशी वर्षावर राहयला आलो. तेव्हापासूनचे सारे दिवस- फक्त गेलं वर्ष वगळता- सुखाचे गेले. नाईक यांनी स्पष्ट केलं.
दोघा भावांच्या संभाषणात वत्सलाबाईदेखील सहभागी झाल्या. त्या म्हणाल्या, आता तर आम्ही इथं रूढलोच आहोत. आता सह्याद्री नको की विंध्याद्री नको! आपण इथं खूष आहोत... वसंत, वत्सला आणि वर्षा- व अक्षरानं सुरू झालेली ही नावं आहेत.
खरंच वर्षा बंगला आपल्याला भाग्याचा ठरेल? याच बंगल्यात आपलं गेलं वर्ष फक्त वाईट गेलं ते 1962चं साल. त्याच वर्षी आपली एकुलती एक लाडकी बेबी आपल्याला सोडून गेली, हे विचारही वत्सलाबाईंच्या मनात डोकावून गेले.
वत्सलाबाईंच्या मनात वर्षा बंगल्यात बऱ्याच सुधारणा करायचं होतं; पण नाईक यांचा सौम्य विरोध होता. ते म्हणतं, आपण काय आज मंत्री आहोत. उद्या कदाचित नसूही. आपल्या खातर सरकारवर खर्चाचा बोजा नको.
पंडित जवाहरलाल नेहरू 1964 मध्ये मुंबईत राजभवनात मुक्कामाला होते. त्यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित महाराष्ट्राच्या राज्यपाल होत्या. नाईक यांनी पंडितजी आणि विजयालक्ष्मी यांना आपल्या घरी भोजनाचं निमंत्रण दिलं. ते त्यांनी स्वीकारलं होतं. वर्षा बंगल्याच्या हिरवळीवर डीनरची व्यवस्था करण्यात आली होती.
मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर नाईक यांनी वर्षा बंगल्यातील वास्तव्य हलविलं; परंतु वसंताच्या हृदयातला ‘वर्षाऋतू’ कायम होता. शेतात राबणाऱ्या कास्तकारांचाच विचार सर्वप्रथम त्यांच्या मनात आला. त्यांनी आपला मुंबईतील मुक्काम हलविला आणि पुसद गाठलं; पण आजही मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून वर्षाचं स्थानमहत्व कायम आहे. किंबहुना ते अधिक ठळक झालं आहे.
(संदर्भ: श्री. कर्णिक मधु मंगेश, दूत पर्जन्याचा, वसंतराव नाईक, कृषिसंशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान, मुंबई, 1994, लोकराज्य, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई, डिसेंबर 2012)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.