सकाळ डिजिटल टीम
म्हसवड : श्री सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात गुलाल-खोबऱ्याची उधळण करीत सुमारे पाच लाखांहून अधिक विक्रमी संख्येच्या भाविकांच्या उपस्थितीत येथील श्री सिद्धनाथ-देवी जोगेश्वरी देवस्थानच्या पारंपरिक शाही विवाह सोहळ्याची सांगता वधू-वराची रथातून मिरवणूक काढून करण्यात आली.
दीपावली पाडवा ते देव दीपावली असा एक महिन्याच्या कालावधीत विविध पारंपरिक धार्मिक उपक्रमाने ‘श्रीं’चा शाही विवाह सोहळा होत असतो.
या विवाह सोहळ्याची सांगता श्री सिद्धनाथ देवी जोगेश्वरी या वधू- वरांच्या उत्सवमूर्तींची रथातून मिरवणूक काढून करण्यात येते.
‘श्रीं’च्या शाही विवाह सोहळ्यानिमित्त ‘श्रीं’च्या मंदिरात पहाटेपासून भाविकांची रांग लागली होती. यात्रेस आलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसरासह शहरातील सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.
यंदा माण तालुक्यात दुष्काळाचे सावट असल्यामुळे पावसाअभावी माण नदीचे पात्र कोरडे राहिले. यामुळे प्रशस्त कोरड्या पात्रात भाविकांच्या मुक्कामाची सुविधा झाली. याबरोबरच यंदा नदीपात्रातूनच रथ मिरवणूक काढण्यात आली.
माण नदीपात्रात रथ मिरवणुकीने प्रवेश करताच नदीपात्रात काल रात्री गावोगावच्या मुक्कामी राहिलेल्या मानाच्या काठ्या व सासणे वाजंत्री समवेत संबंधित भाविकांनी ‘श्रीं’च्या रथास भेटविल्या. त्यानंतर राजवाड्यातून रथाचे मानकरी मिरवणुकीने ‘श्रीं’च्या मंदिराकडे मार्गस्थ झाले. (फोटो : सलाउद्दीन चोपदार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.