सकाळ डिजिटल टीम
वजनाला हलके पण मजबूत लाकूड; जाड साल आणि मोठ्या पोकळीचा भोपळा वापरून संगीत नगरी मिरजेतील कारागिरांकडून बनवल्या जाणाऱ्या सतार व तानपुऱ्याला भौगोलिक मानांकन (G. I.) मिळाले आहे.
तंतुवाद्य निर्मितीतील वैशिष्ट्य व गुणवत्ता या जोरावर हे यश मिळाले असून, संगीतनगरीच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग प्रोत्साहन अंतर्गत व्यापार विभागांतर्गत भौगोलिक संकेत नोंदणीद्वारे हे मानांकन मिळाले आहे.
तानपुरा वाद्यास जीआय मानांकनासाठी सोलटून म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्रोड्युसर या संगीतवाद्य निर्मिती कंपनीने, तर सतार वाद्यासाठी मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर संस्थेने प्रस्ताव सादर केला होता.
या दोन्ही प्रस्तावांना मान्यता मिळाल्याची माहिती संस्थेचे प्रमुख मोहसीन मिरजकर, मुबीन मिरजकर यांनी दिली. त्यामुळे जगभरातील संगीतक्षेत्रात मिरजेच्या तंतुवाद्यांचे मोल वाढणार आहे.
श्रवणीय सुरावटींवर भौगोलिक मानांकनाची छाप उमटल्याने मिरज शहराची देशात वेगळी ओळख निर्माण होणार आहे.
सतार व तानपुरा वाद्यास जीआय मानांकन मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या वाद्यांना मागणीही वाढणार आहे.
तंतुवाद्य निर्यात आणि संगीतनगरी म्हणून मिरजेला पर्यटनाच्या नकाशावर आणण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार आहे, असा विश्वास मिरजकर यांनी व्यक्त केला.