Pranali Kodre
आयपीएल 2024 स्पर्धेच्या 19 व्या सामन्यात 6 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला राजस्थान रॉयल्स संघाने 6 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला.
या सामन्यात बेंगळुरूच्या विराट कोहली आणि राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलरने शतक करत मोठ्या वैयक्तिक विक्रमाला गवसणी घातली.
विराटने या सामन्यात 72 चेंडूत नाबाद 113 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 4 षटकार मारले. तसेच बटलरने 58 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांसह 100 धावांची नाबाद खेळी केली.
6 एप्रिल 2024 पर्यंत हे विराटचे आयपीएलमध्ये केलेले आठवे शतक ठरले, तर बटलरचे आयपीएलमधील सहावे शतक ठरले.
त्यामुळे विराट आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदज ठरला आहे.
तसेच जॉस बटलरने आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ख्रिस गेलची बरोबरी केली आहे.
त्यामुळे आता आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटच्या पाठोपाठ गेल आणि बटलर प्रत्येकी 6 शतकांसह संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
या विक्रमाच्या यादीत केएल राहुल, डेव्हिड वॉर्नर आणि शेन वॉटसन प्रत्येकी 4 आयपीएल शतकांसह संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत.