Pranali Kodre
भारताने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 2 एप्रिल 2011 रोजी एमएस धोनीच्या नेतृत्वात विश्वविजयाला गवसणी घातली होती. हा विजय नेहमीच चाहत्यांच्या मनात कोरलेला आहे.
त्यावेळी एमएस धोनी वनडे वर्ल्डकप जिंकणारा भारताचा कपिल देव यांच्यानंतरचा दुसराच कर्णधार ठरला होता.
दरम्यान, या विश्वविजयाला 13 वर्षे झाली तरी अद्याप भारताला वनडे वर्ल्डकप जिंकता आलेला नाही.
अशातच धोनी सध्या चेन्नई सुपर किंग्ससह मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईत आला आहे. यावेळी त्याने मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयाला भेट दिली.
बीसीसीआय मुख्यालयात तो गेलेला असताना त्याने तिथे असलेली 2011 वर्ल्डकप ट्रॉफीही न्याहाळली. यावेळीचे फोटोही बीसीसीआयने शेअर केले आहेत.
धोनीने जवळपास १३ वर्षांनंतर पुन्हा एकदा वर्ल्डकप ट्रॉफीला हात लावलेले फोटो पाहून चाहतेही भावूक झाले असून हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की धोनीच्या नेतृत्वात भारताने 2007 टी20 वर्ल्डकप, 2011 वनडे वर्ल्डकप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. या तीन आयसीसी स्पर्धा जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे.