Pranali Kodre
आयपीएल 2024 स्पर्धेतील विशाखापट्टणमला झालेल्या 13व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सने 20 धावांनी विजय मिळवला.
पण असे असले तरी चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनीचा आक्रमक अंदाजातील फलंदाजी या सामन्यातील मुख्य आकर्षण ठरली.
दिल्लीविरुद्ध 192 धावांचा पाठलाग करताना चेन्नईने 120 धावांत 6 विकेट्स गमावल्यानंतर धोनी आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला.
त्याने सुरुवातीपासूनच फटकेबाजी करताना 16 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 37 धावा केल्या. तसेच जडेजाबरोबर 7 व्या विकेटसाठी नाबाद 51 धावांची भागीदारी केली.
चेन्नई पराभूत झाली असली तरी बऱ्याच काळानंतर धोनीची फटकाबाजी पाहायला मिळाल्याने त्याची ही खेळी चाहत्यांसाठी अविस्मरणीय ठरली.
विशेष म्हणजे धोनीने त्याच्या या खेळीमुळे जुन्या आठवणीही ताज्या केल्या. धोनीने विशाखापट्टणमला फटकेबाजी करण्याची ही पहिलीच वेळ नाही.
यापूर्वी 2005 मध्ये धोनीने पाकिस्तानविरुद्ध विशाखापट्टणममध्ये झालेल्या वनडेत 123 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकारांची बरसात करत 148 धावा केल्या होत्या. हे धोनीचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक होते.
साल 2016 च्या आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध विशाखापट्टणममध्येच रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळताना धोनीने 32 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांसह 64 धावांची खेळी केली होती. त्या सामन्यात त्याने 20 व्या षटकात 23 धावा ठोकल्या होत्या आणि पुण्याला विजय मिळवून दिला होता.