Pranali Kodre
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत ८ ऑगस्ट रोजी पुरुषांच्या भालाफेकीची अंतिम फेरी पार पडली.
यामध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्णपदक जिंकले, तर नीरज चोप्राने रौप्य पदक पटकावले. ग्रेनडाचा अँडरसन पीटर्सने कांस्य पदक जिंकले.
नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते, तर यंदा रौप्य पदक जिंकले. त्यामुळे तो नॉर्मन प्रिचर्ड यांच्यानंतर भारतासाठी दोन ऑलिम्पिक मेडल जिंकणारा दुसराच ऍथलिट ठरला.
दरम्यान, ऑलिम्पिक मेडल जिंकल्यानंतर पॅरिसमध्ये भारतीय संघाच्या एका सोहळ्यात नीरज त्याच्या यशाबद्दल बोलत होता.
या सोहळ्यासाठी भारताचा टेनिसपटू महेश भूपती आणि त्याची पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताही उपस्थित होते.
लारा दत्ताने यावेळी नीरजचा व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीला शेअर केला असून त्यात त्याला आणि अर्शद नदीमला स्पर्धा करताना पाहणे अविश्वसनीय होते, असं तिने म्हटलं आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की नीरजने त्याचं रौप्य पदक दाखवलं, पण त्याचबरोबर त्याने यावेळी सुवर्णपदक न जिंकल्याबद्दल खंत व्यक्त केली. मात्र त्याने म्हटलं की पदक हे पदक असतं आणि देशासाठी ते जिंकून ट्रॅकची फेरी मारण्याचा अनुभव शानदार असतो.
नीरजने अंतिम सामन्यात त्याचा सिजन बेस्ट देत ८९.४५ मीटर लांब भाला फेकत रौप्य पदक जिंकले. तसेच अर्शदने ऑलिम्पिकमधील विक्रम मोडत ९२.९७ मीटर भाला फेकून सुवर्णपदक नावावर केले. कांस्य पदक जिंकलेल्या अँडरसन पीटर्सने ८८.५४ मीटर लांब भाला फेकला.