Amit Ujagare (अमित उजागरे)
पंढरपुरातील ज्या मंदिरात विठ्ठल विटेवर उभा आहे. त्या मंदिराची रचना यादवकालीन आहे.
मंदिरात यादवकालीन स्तंभ, पाषाण, निरनिराळी कलाकुसर केलेले वास्तुखंड दिसतात.
विठ्ठल मंदिराचं आजचं बांधकाम १६ व्या शतकातलं आहे. तर मंदिराचं शिखर सन १८३० मध्ये भोरच्या महाराजांनी बांधलं आहे.
विठ्ठलमूर्तीबाबत शतकांपासून मतभेद आहेत. इ. स. ४०० पासून ही मूर्ती अस्तित्वात असल्याचे डॉ. भगवानलाल इंद्रजी यांचे मत आहे.
रा. चिं. ढेरेंच्या मते गाभाऱ्यातील आजची मूळ मूर्ती नाही तर माढ्यातील विठ्ठल मंदिरात ती आहे. विठ्ठल हे विष्णुदेवाचे रूप नसून एक वीरगळ (मेंढपाळाचा) देव आहे, असंही काही संशोधक सांगतात.
तर इतिहासाचे अभ्यासक डॉ. आ. ह. साळुंखे यांच्यामते बुद्ध आणि विठ्ठल एकच आहे.
डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या मते कोणत्याही मूर्तीची ओळख ठरवण्यासाठी मूर्तिलक्षणं महत्त्वाची असतात.
विठ्ठल ‘विटेवरी उभा’ कटेवरी हात’ अशा स्वरूपाचा आहे. योगमूर्ती असल्यानेच रखुमाई त्यांच्याजवळ नाही.
पंढरीतील विठ्ठल मंदिराच्या परिसरात पाच शिलालेख सापडले आहेत. होनसळ व यादवांच्या काळातले आहेत.
यात होनसळ काळातील तिसऱ्या सोमेश्वरच्या (इ.स. १२३७) शिलालेखात वारीचा उल्लेख आहे. म्हणजेच संत ज्ञानेश्वरांपूर्वी किमान १०० वर्षे आधीपासून पंढरपूरची वारी चालू असावी.