Swadesh Ghanekar
इशा सिंग जन्म १ जानेवारी २००५ मध्ये हैदराबाद येथे झाला. २०१८ मध्यये तिने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आणि १३ व्या वर्षी ही स्पर्धा जिंकणारी ती तरुण नेमबाज ठरली. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ती याच गटात खेळणार आहे.
सचिन सिंग व श्रीलता यांच्या घरी जन्मलेल्या इशाला सुरुवातीला गो कार्टिंग, बॅडमिंटन, टेनिस व स्केटिंगची आवड होती. तिचे वडील रॅली रेसर आहेत.
हैदराबादमधील गचिबोवली ॲथलेटिक स्टेडियममधील शूटिंग रेंजला इशाने एकदा सहज भेट दिली आणि त्यानंतर तिने एअर पिस्तुल खेळण्याचा निर्णय घेतला. तिने नंतर पुण्यातील गन फॉर ग्लोरी अकादमीमध्ये माजी ऑलिम्पिक पदक विजेता गगन नारंग यांच्याकडून प्रशिक्षण घेतले.
इशा सिंगने २०१४ मध्ये नेमबाजीला सुरुवात केली आणि पुढच्याच वर्षी तिने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात तेलंगणाची राज्य चॅम्पियन बनली.
इशाने २०१५ मध्ये तिरुवनंतपुरम येथे पार पडलेल्या ६२ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत राष्ट्रकुल आणि युवा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती मनू भाकर आणि अनेक पदक जिंकणाऱ्या हीना सिद्धू यांचा पराभव केला.
इशा सिंगने १० मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत सुवर्ण जिंकले आणि ती १३ वर्षी वरिष्ठ श्रेणीतील सर्वात तरुण चॅम्पियन बनली. तिने तिथे युथ आणि ज्युनियर प्रकारातही सुवर्णपदक पटकावले.
इशा सिंगने जानेवारी २०१९ मध्ये खेलो इंडिया युथ गेम्समध्ये १७ वर्षांखालील गटात १० मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
इशा सिंगने ८ जानेवारी २०२४ रोजी जकार्ता येथे आशियाई पात्रता स्पर्धेत पॅरिस ऑलिम्पिक खेळासाठी १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात ऑलिम्पिक कोटा मिळवला.
इशाने वयाच्या १८ व्या वर्षी १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धा, हंगझोऊ २०२२ मध्ये ४ पदके जिंकून इतिहास रचला. तिने २०१९ मध्ये जर्मनी येथे झालेल्या ISSF ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत रौप्य पदक आणि आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये १० मीटरमध्ये दोन सुवर्णपदके जिंकली.
इशा सिंगला २०२३ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यापूर्वी २०२० मध्ये तिला प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ( १८ वर्षांखालील ) मिळाला.