Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघ नोव्हेंबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.
भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ही ५ सामन्यांची कसोटी मालिका २२ नोव्हेंबरपासून खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयने केली आहे.
मात्र या संघात काही दिग्गज खेळाडूंची नावंही गायब आहेत, ज्यांनी यापूर्वी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गाजवली आहे. तसेच ज्या खेळाडूंना संधी मिळेल अशी अपेक्षा होती, अशाही काही खेळाडूंनी नावं गायब आहेत.
भारताचा मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणेने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली असून त्याने १७ सामन्यांमध्ये २ शतके आणि ५ अर्धशतकांमध्ये १०९० धावा केल्या आहे. तसेच २०२०-२१ मालिकेत विजेत्या भारतीय संघाचा तो कर्णधारही होता.
टेस्ट स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुजाराने नेहमीच बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने २४ सामन्यांमध्ये २०३३ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ शतकांचा आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला दुखापत असल्याने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२४-२५ मालिकेसाठी निवडण्यात आलेलं नाही.
चायनामन गोलंदाज कुलदीप यादवचाही बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२४ मालिकेसाठी भारतीय संघात समावेश नाही. त्याला दीर्घकाळापासून मांडीची दुखापत सतावत असून त्यावर त्याला उपचार करावे लागणार आहेत.
लक्षणीय गोष्ट अशी की अष्टपैलू अक्षर पटेल यालाही बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२४-२५ मालिकेसाठी भारतीय संघातून वगळण्यात आलं आहे.
मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने भारताच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये दुखापतीनंतर पुनरागमन केलं असलं तरी त्याला अद्याप कसोटी संघात पुनरागमन करता आलेलं नाही. त्याला आता बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२४-२५ मालिकेसाठी निवडण्यात आलेलं नाही.
महाराष्ट्राचा कर्णधार असलेल्या ऋतुराज गायकवाडलाही संघात स्थान देण्यात आलेलं नाही. त्याला गेल्या काही दिवसात इराणी कप स्पर्धेत आणि आगमी भारत अ संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील प्रथम श्रेणी सामन्यांसाठी नेतृत्वाचीही जबाबदारी दिली आहे. मात्र असं असतानाही त्याला राष्ट्रीय संघात संधी मिळालेली नाही.
इशान किशन गेल्या काही दिवसात सातत्याने देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसतोय. ऋतुराजच्या नेतृत्वात सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारत अ संघाचाही तो भाग आहे. मात्र त्यालाही बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२४-२५ मालिकेसाठी भारतीय संघात संधी मिळालेली नाही.
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.