आशुतोष मसगौंडे
महाराष्ट्रात लोकसभेसाठी शेवटच्या टप्प्यातील जागांवर 20 मे रोजी मतदान होणार आहे. त्यानिमित्ताने महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो चे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई महानगर प्रदेशांतर्गत येणाऱ्या लोकसभेच्या जागेवरून निवडणूक लढवणाऱ्या भाजपच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संध्याकाळी मुंबईत मोठा रोड शो करत शक्तीप्रदर्शन केले.
पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्याच्या दोन्ही बाजूला आतुरतेने उभे होते. 20 मे रोजी मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांसह महाराष्ट्रातील एकूण 13 जागांवर मतदानापूर्वी पंतप्रधानांचा हा रोड शो झाला.
ईशान्य मुंबईतील घाटकोपर (पश्चिम) येथील अशोक सिल्क मिल येथून सायंकाळी सातच्या सुमारास भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान मोदी यांचा रोड शो सुरू झाला आणि शहराच्या विविध भागातून पुढे जात घाटकोपर (पूर्व) येथील पार्श्वनाथ चौकापशी संपला.
भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या घाटकोपरमध्ये मोठ्या संख्येने गुजराती राहतात, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा रोड शो भाजपसाठी महत्त्वाचा होता.
पंतप्रधानांसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ईशान्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा आणि उज्ज्वल निकम हेही यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधानांच्या रोड शोपूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव जागृती नगर ते घाटकोपर स्थानकांदरम्यानची मुंबई मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती.
अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्याचे '४०० वर्षांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल' पंतप्रधानांचे आभार मानणारे फलक लोकांनी हातात घेतले होते. या वेळी 'अब की बार ४०० पार' अशा घोषणा देणारे फलक लोकांच्या हाती होते.