सकाळ डिजिटल टीम
कैद्यांच्या (Prisoners) आरोग्याचा व रोजगाराचा प्रश्न सुरक्षित करण्यासाठी त्यांचे आयुष्मान भारत (Ayushman Bharat) व ई-श्रम कार्ड (E-Labour Card) काढण्याचा उपक्रम जिल्हा कारागृहामध्ये राबविण्यात येत आहे.
देशातील कारागृहांमध्ये (Jail) साताऱ्यात हा पहिलाच राबविला जात आहे. मुंबईच्या समता फाउंडेशनकडून (Mumbai Samata Foundation) राज्यातील कारागृहांमध्ये प्रत्येक महिन्याला त्वचारोग शिबिर व नेत्र शिबिर आयोजित केले जाते.
तसेच या आजारांवर औषध उपचार करून विनामूल्य औषधे व चष्मे देण्यात येतात. सातारा जिल्हा कारागृहाचे अधीक्षक शामकांत शेडगे यांनी फाउंडेशनचे अध्यक्ष अग्रवाल यांच्याशी संपर्क साधून कैद्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आयुष्मान भारत कार्ड व ई-श्रम कार्ड काढण्याचा उपक्रम हाती घेण्याबाबत चर्चा केली.
त्याला संमती दर्शवत तातडीने जिल्हा कारागृहात या उपक्रमाला प्रतिनिधी आदित्य उखळकर व विश्वजित बागल यांनी सुरुवात केली. देशात प्रथमच होणाऱ्या अशा प्रकारच्या संकल्पनेला राज्याचे कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी पाठिंबा दर्शविला.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृह अधीक्षक शेडगे यांनी जिल्हा कारागृहात हा उपक्रम सुरू केला. जिल्हा कारागृहात १८ महिला अंडरट्रायल कैद्यांसह सुमारे ३५० कैदी बंद आहेत. या उपक्रमासाठी कैद्यांची शिधापत्रिका व आधार कार्ड असणे आवश्यक असते.
ही कागदपत्र उपलब्ध असलेल्या कारागृहातील ६५ जणांचे आयुष्मान भारत व ई-श्रम कार्ड काढण्यात आले आहे. कारागृहात आलेले बहुतेक कैदी गरीब असतात.
आयुष्मान भारत कार्ड प्रदान केल्यामुळे जामीन मिळवून किंवा शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर गेल्यावरही त्यांना वैद्यकीय लाभ मिळू शकणार आहे.