Pranali Kodre
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या मुलाची आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या १९वर्षांखालील मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे आणि चार दिवसीय सामन्यांसाठीच्या मालिकेसाठी BCCI ने आज संघ जाहीर केला. या दोन्ही संघांत समित द्रविडचे नाव आहे.
समितने नुकत्याच झालेल्या महाराजा ट्वेंटी-२० लीगमध्ये आक्रमक फलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याने या स्पर्धेत ११४ च्या स्ट्राईक रेटने ७ सामन्यात ८२ धावा केल्या.
समित हा अष्टपैलू खेळाडू असून उजव्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजी करतो.
तो सर्वात आधी प्रकाशझोतात एप्रिल २०१६ मध्ये आलेला, जेव्हा त्याने एका १४ वर्षांखालील स्पर्धेत १२५ धावांची शानदार खेळी केली होती.
त्याने २०१८ मध्ये कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या १४ वर्षांखालील शालेय स्पर्धेतही १५० धावांची दमदार खेळी केली होती. त्याने २०१९ मध्येही १४ वर्षांखालील सामन्यात त्याने द्विशतकी खेळी केली होती.
त्याने त्याच्या कामगिरीमुळे कर्नाटकच्या १९ वर्षांखालील संघातही स्थान मिळवले. त्याने २०२४ ची कुच बिहार ट्रॉफी १९ वर्षांखालील कर्नाटक संघाला जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. या स्पर्धेत त्याने ८ सामन्यांमध्ये ३६२ धावा केल्या आणि १६ विकेट्स घेतल्या.