सकाळ डिजिटल टीम
राष्ट्रपती भवनच्या आवारातील 'अमृत उद्यान' आज, 2 फेब्रुवारीपासून सर्वसामान्य लोकांसाठी खुले करण्यात आले आहे. या उद्यानाला तुम्ही 31 मार्चपर्यंत भेट देऊ शकता.
तुम्ही उद्यानात अनेक प्रकारचे गुलाब, ट्यूलिप, औषधी झाडं आणि वनस्पती पाहू शकता. अमृत उद्यान हे एक असं ठिकाण आहे, जिथं देशातूनच नव्हे तर परदेशातूनही पर्यटक भेट देण्यासाठी येतात.
अमृत उद्यान दरवर्षी काही आठवडे सर्वसामान्यांसाठी खुले केले जाते. यामध्ये तुम्ही फेरफटकाही करू शकता. ही बाग देशातील सर्वात सुंदर बागांपैकी एक आहे.
इथं येण्यासाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही तिकिटं घेऊ शकता. मात्र, तुम्ही ऑनलाइन तिकीट खरेदी केल्यास तुम्हाला इथं प्रवेश करणं सोपं होऊन जाईल.
यासाठी तुम्ही भारताच्या राष्ट्रपतींच्या https://visit.rashtrapatibhavan.gov.in/visit/amrit-udyan/rE या वेबसाइटला भेट देऊन स्वतःची नोंदणी करू शकता. ऑफलाइन बुकिंग करायचं असल्यास राष्ट्रपती भवनाच्या गेट क्रमांक 35 मधून प्रवेश घेता येईल.
सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत उद्यान खुलं राहील. मात्र, दुपारी 4 नंतर उद्यानात प्रवेश मिळणार नाही. तसेच ही बाग सोमवारी बंद राहील, हे लक्षात ठेवा.
त्याचबरोबर इथं जाण्यासाठी कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही. पण, बुकिंग अनिवार्य आहे. अशा प्रकारे तुम्हीही इथं जाऊन नैसर्गिक सौंदर्याची प्रशंसा करू शकता.