आशुतोष मसगौंडे
सैराट चित्रपटाच्या यशानंतर रिंकू राजगुरूचे फॅन फॉलोइंग मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही दिवसांपूर्वी रिंकू मुंबईत एकटीच राहत असल्याचं सांगितलं होतं.
एकटी राहताना कधी उदास वाटल्यास काय करते, या प्रश्नावर तिने अलीकडेच एका मुलाखतीत आपला अनुभव शेअर केला.
एकटेपणाबात रिंकू म्हणाली, "अकलूजला माझ्या घरी असताना कधीच मला एकटं वाटलं नाही. घरच्यांनीही कधी तसं जाणवू दिलं नाही; पण मुंबईत राहून आता जेव्हा एकटी होते, तेव्हा कधी उदास वाटलं तर घरी परत जाते."
"मुंबईत असताना जरी मला कसंतरी वाटलं, रडायला आलं, एकटं वाटलं, तरी मी कोणालाही सांगत नाही. गाणी ऐकते किंवा थोडा वेळ बाहेर फिरायला जाते.आईला फोन करून तिचा आवाज ऐकला तरी बरं वाटतं किंवा मैत्रिणींशी गप्पा मारते."
रिंकूला तिच्या आयुष्यातील उद्दिष्ट विचारल्यावर ती म्हणाली, "माझं ध्येय चांगली कामं करायचं आहे. मुंबईत स्वतःचं घर आणि गाडी घेणं हा माझा स्वतःसाठीच ठरवलेला गोल आहे."
रिंकू म्हणाली मला प्रवासही करायचा आहे, कारण मी फक्त आई-बाबा आणि भावासोबतच वाढले आहे. त्यामुळे जेव्हा सगळ्यांसमोर बोलायचं असतं तेव्हा थोडं दडपण येतं. हे दडपण कमी करणं हे माझं दुसरं ध्येय आहे."
रिंकूने नवी गाडी खरेदी करण्याचं एक स्वप्न नुकतंच पूर्ण केलं आहे. या आनंदाच्या बातमीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आणि तिच्या मित्रमैत्रिणींसह चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलं.
सैराटमधून कारकिर्दीची सुरुवात करणारी रिंकू आता येत्या काळात अनेक नवनवीन चित्रपट आणि मालिकांमध्ये पाहायला मिळणार आहे.