Pranali Kodre
न्यूझीलंड क्रिकेट संघाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्ध झालेला तिसऱ्या कसोटी सामन्यात २५ धावांनी विजय मिळवला.
या विजयासह न्यूझीलंडने मालिकाही ३-० अशा फरकाने जिंकत भारताला व्हाईटवॉश दिला.
दरम्यान, मुंबई कसोटीत भारताकडून ऋषभ पंतने दोन्ही डावात अर्धशतके झळकावत चांगली झुंज दिली होती. त्याने पहिल्या डावात ६० आणि दुसऱ्या डावात ६४ धावा केल्या होत्या.
परंतु, असं असतानाही अन्य प्रमुख भारतीय फलंदाज फार खास काही करू शकले नाही, त्यामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
मुंबई कसोटीपूर्वी न्यूझीलंडने भारताला बंगळुरूला झालेल्या पहिल्या कसोटीत ८ विकेट्सने पराभूत केले होते. त्यानंतर पुण्यात झालेल्या दुसऱ्या कसोटीत ११३ धावांनी न्यूझीलंडने भारताला पराभूत केले होते.
दरम्यान, भारताला मायदेशात ३ किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉश देणारा न्यूझीलंड पहिलाच संघ ठरला.
भारताच्या या लाजीरवाण्या पराभवानंतर ऋषभ पंतने केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. त्याने इंस्टाग्राम स्टोरीला एक प्रेरणादायी संदेश लिहिलेली पोस्ट शेअर केली आहे.
ऋषभ पंतने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलेल्या संदेशाचा साधारण अर्थ होतो की 'आयुष्य वेगवगेळ्या ऋतुंनी बनले आहे. जेव्हा तुम्ही खचलेले असता, तेव्हा लक्षात ठेवा आयुष्याच्या चक्रामध्ये विकासही होतो. अपयशाला अलिंगन द्या, कारण ते तुम्हाला अधिक यशासाठी तयार करत असते.'