सकाळ डिजिटल टीम
रणरणत्या उन्हात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सळसळत्या उत्साहातील कार्यकर्त्यांच्या साक्षीने, तुतारीच्या निनादात रणशिंग फुंकत ज्येष्ठ नेते शरद पवारांनी आपल्या निष्ठावंताला सातारा लोकसभेसाठी विजयी भव असा आशीर्वाद दिला.
छत्रपती शिवाजी महाराज, यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आणि शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन आमदार शशिकांत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केला.
तत्पूर्वी तळपत्या सूर्याच्या साक्षीने आणि तुतारीचा निनाद करत महाविकास आघाडीतर्फे महारॅलीद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
यावेळी जमलेल्या हजारो पवार समर्थकांनी दिलेल्या घोषणांनी सातारा शहर दणाणून गेले.
शरद पवार यांचे आगमन होताच तुतारीचा निनाद, ढोलताशांचा कडकडाट आणि फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.
ग्रामीण भागाची ओळख असणारी गांधी टोपी अन् धोतर परिधान केलेल्या वयस्करांची संख्या महारॅलीत मोठी होती.
रणरणत्या उन्हाने घामात निथळणारी ही माणसे, काय होतंय या उन्हानं, असे म्हणत रस्त्याकडेला थांबलेल्या ओळखीतल्यांना खेचून घेत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चालत होती.