सकाळ डिजिटल टीम
पुणे म्हटलं की अनेकांना शनिवारवाडा आपसूकच आठवतो. पुणेकरांसाठी शनिवारवाडा हा अभिमानाचं प्रतिक आहे.
पुण्याची शान असलेल्या या शनिवारवाड्यातूनच अनेक वर्षे पेशव्यांनी राज्याचा कारभार पाहिला होता.
दरम्यान, शनिवारवाड्याबद्दलचे कुतूहल आजही अनेकांच्या मनात आहे.
श्रीमंत बाजीराव पेशवे सासवडमधून कारभार पाहात होते. दरम्यान शाहू महाराजांनी वंशपरंपरागत असलेली पुण्याची जहागीरही पेशव्यांकडे सोपवली. यानंतर बाजीरावांनी पुण्याला आपली राजधानी करण्याचा निर्णय घेतला.
यावेळची एक आख्यायिका अशी की बाजीराव पेशवे मुठा नदीच्या काठी घोड्यावरून रपेट मारत असताना त्यांनी एक ससाच शिकारी कुत्र्याचा पाठलाग करतानाचे दृश्य पाहिले. त्यामुळे त्यांना ही जागा विलक्षण वाटली आणि येथे वाडा बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
मुठा नदीकाठी असलेल्या मुर्तजाबाद पेठेची जागा झांबरे पाटलांच्या मालकीची होती. ती जागा बाजीराव पेशव्यांनी विकत घेण्यास सांगितली. याच जागेपासून लाल महालही जवळ होता, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण गेले होते.
विशेष म्हणजे लाल महालाची जागाही झांबरे पाटलांची होती, जी शहाजी महाराजांनी १६३६ साली विकत घेतली होती.
दरम्यान, झांबरे पाटलांकडून जागा विकत घेतल्यानंतर १७३० मध्ये शनिवारवाडा बांधण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले. (Shaniwar Wada Built on Land Purchased from Zambre Patil by Bajirao Peshwa)