Sandip Kapde
टाकरखेडासंभू श्रीक्षेत्र वायगाव येथे महाभारतातील इतिहासाची साक्ष देणारी उजव्या सोंडेची अद्भुत गणेशमूर्ती पाहावयास मिळते.
पांडव अज्ञातवासात असताना ते चिखलदरा येथे आले होते.
परतीच्या वेळी याच मूर्तीचे दर्शन घेऊन पांडवांनी अज्ञातवास संपविला, अशी आख्यायिका आहे.
अशी पार्श्वभूमी लाभलेली गणेशमूर्ती सहाशे वर्षांपूर्वी खोदकामात सापडली. ती लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
महाराष्ट्रात दोनच ठिकाणी सिद्धिविनायकाची ही मूर्ती पाहावयास मिळते.
मुंबईनंतर भातकुली तालुक्यात वायगाव येथे या सिद्धिविनायकाची मूर्ती आहे.
अमरावती परतवाडा मार्गावर असलेल्या वायगाव येथील सिद्धिविनायकाचा इतिहास महाभारतातील विराट पर्वापर्यंत आहे.
मध्ययुगीन काळात ही मूर्ती मूर्तीभंजक आक्रमकाच्या भयाने भूमिगत ठेवण्यात आली होती.
गावाच्या सभोवताल असलेले अचलपूर, दारापूर, खोलापूर ही ठाणी असलेली गावे मुघलांच्या ताब्यात होती.
त्यानंतर सहाशे वर्षांचा काळ लोटला. त्यामुळे मूर्तीचा अचूक ठाव ठिकाणा लागला नव्हता. लोकांना साक्षात्कार व्हायचा, परंतु मूर्ती सापडत नव्हती.
अचानक खोदकामात ही मूर्ती वायगाव येथे इंगोले यांच्या घरात सापडली. तो काळ सोळाव्या शतकातला होता.
तेव्हापासून मूर्ती वाडारुपी मंदिरात प्रतिस्थापित करण्यात आली आहे.
कालांतराने गणेश भक्तांची गर्दी वाढू लागल्याने इंगोले कुटुंबाने भक्तांच्या सुविधेसाठी ट्रस्टची स्थापना केली. त्यानंतर येथे मंदिर बांधण्यात आले.
त्यासाठी याच कुटुंबातील लोकांनी शेती दिली, याचे व्यवस्थापन लालजी पाटील, सीताराम पाटील, तुळशीराम पाटील, शिवराम पाटील, तुकाराम पाटील, श्रीराम पाटील व दयाराम पाटील यांच्याकडे आहे. ट्रस्टची धुरा अध्यक्ष म्हणून विलास तुकाराम इंगोले यांच्याकडे आहे.
सिद्धिविनायक मूर्ती उजव्या सोंडेची आहे. उजव्या बाजूला सिद्धी व डाव्या बाजूला रिद्धी आहेत.
एकदंत, पायावर पद्म, शंख चिन्हांकित आहे. हातातील माळ व मोदक ऐहिक जीवनातील समृद्धीचा संकेत देतात.
उत्तरायण व दक्षिणायन होताना सूर्योदयाची पहिली किरणे मूर्तीवर पडतात.
वर्षातून दोनदा येथे उत्सव साजरे होतात.
भाद्रपद शुक्ल चतुर्थी ते पौर्णिमेपर्यंत गणेश उत्सवात दररोज दहा दिवस भक्तांना अन्नदान, ज्ञानदान, भजन, कीर्तन, काकडा, हरिपाठ होतो.
पौर्णिमेला टाळ-मृदंग व नामघोषात पार्थिव मूर्तर्तीच विसर्जन होते.
गणेश जयंती उत्सवात महाराष्ट्रातील हजारो भक्त येथे दाखल होतात. मध्य प्रदेशसह परराज्यातील भाविकही येथे भेट देतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.