सकाळ डिजिटल टीम
उष्णतेच्या लाटेने सिंधुदुर्ग जिल्हा आज अक्षरश: होरपळून गेला. उच्चांकी ३९ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
ढगाळ वातावरणामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. वाढलेल्या उष्म्यामुळे आंबा फळगळीचे प्रमाण वाढले आहे.
गेल्या काही दिवसांपासून तापमान सातत्याने वाढत होते; परंतु, सायंकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ- दहापर्यंत वातावरण थंड राहत होते.
गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होण्यास सुरूवात झाली. सकाळपासूनच तापमान वाढीला सुरुवात झाल्याचे चित्र आहे.
हवामान विभागाने सिंधुदुर्गला उष्णतेचा यलो अलर्ट जाहीर केला होता. काल पहाटे जिल्ह्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल, अशी स्थिती होती.
परंतु, सकाळपासून उष्णतेच्या झळा झोंबत होत्या. सकाळी साडेनऊच्या दरम्यान तापमानाने ३४ अंशांचा आकडा पार केला. त्यानंतर वाढ होत दुपारी उच्चांकी ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, हवामान विभागाने आज आणि उद्या दोन दिवसांत हलक्या पावसाचा अंदाज देखील दिला आहे.