Pranali Kodre
आयपीएल 2024 स्पर्धेतील क्वालिफायर वन सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला 8 विकेट्सने पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला.
या सामन्यात हैदराबादचा पराभव झाला असला तरी त्यांचे आव्हान संपलेले नाही. त्यांना अंतिम सामन्यात पोहचण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.
सनरायझर्स हैदराबादला आता 24 मे रोजी चेन्नईत होणाऱ्या क्वालिफायर-2 सामन्यात खेळावे लागणार आहे.
त्याचमुळे सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने आपल्या संघसहकाऱ्यांना हा पराभव विसरून क्वालिफायर-2 सामन्याची तयारी करण्याचा सल्ला दिला आहे.
कमिन्स म्हणाला, 'आम्ही हा पराभव लवकरात लवकर मागे टाकण्याचा प्रयत्न करू, चांगली गोष्ट ही आहे की आम्हाला चेन्नईत आणखी एक संधी आहे. टी-२० प्रकारात असा एखादा दिवस येतो तेव्हा काहीच तुमच्या बाजूने घडत नाही.'
तो म्हणाला, 'अपेक्षा होती तशी फलंदाजी झाली नाही, तसेच गोलंदाजीतही अपयशी ठरलो. कोलकाताने खूप चांगली गोलंदाजी केली. सुरुवातीला खेळपट्टीतून गोलंदाजांना मदत होती, नंतर ती फलंदाजीसाठी चांगली होत गेली.'
कमिन्स पुढे म्हणाला,'यंदाच्या स्पर्धेत आम्ही सर्व परिस्थितीत खेळलो. पुढचा सामना चेन्नईत खेळायचा आहे. येथे चांगले यश मिळू शकेल, त्यामुळे अहमदाबादमध्ये झालेला पराभव लवकर विसरून पुढे जाऊ.'
सनरायझर्स हैदराबादला क्वालिफायर-2 मध्ये एलिमिनेटर सामन्यातील विजयी संघाबरोबर सामना खेळायचा आहे.