सकाळ डिजिटल टीम
मालवणातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला आणि एकूणच पुतळे व स्मारकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील काही प्रातिनिधिक पुतळ्यांची वैशिष्ट्ये, ही शिल्पे साकारताना ऊन-वारा-पाऊस या साऱ्या गोष्टींचा केलेला विविधांगी अभ्यास आणि त्यांचे जतन व संवर्धन अशा अनुषंगाने घेतलेला हा धांडोळा...
छत्रपती शिवाजी महाराज चौकात ब्रिटिश गव्हर्नर लेस्ली विल्सन यांचा पुतळा उभारला होता. स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा भाग म्हणून स्वातंत्र्यसैनिकांनी त्यावर डांबर फेकून तो विद्रूप केला. शेवटी हा पुतळा काढून टाकण्यात आला. त्याच ठिकाणी अल्पावधितच चित्रपतपस्वी भालजी पेंढारकर आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी पंचधातूच्या हजारो वर्षे टिकणाऱ्या माध्यमात महाराजांचा पुतळा साकारला आणि १३ मे १९४३ रोजी त्याची प्रतिष्ठापना केली.
कोल्हापुरातील छत्रपती शिवरायांचा सर्वांत मोठा पुतळा कोणता असेल, तर तो शिवाजी विद्यापीठात असणारा अश्वारूढ पुतळा. साधारण १५ ते १६ फूट उंचीचा असा हा पुतळा अत्यंत आवेशपूर्ण आणि अश्वाच्या गतीवरील महाराजांचे पूर्ण नियंत्रण दर्शवतो. अश्वारूढ शिवराय त्यांच्या वाटचालीमधील विजयाच्या उत्तुंग अवस्थेत उंच कड्यावर उभारल्याचा भास येथे होतो. उजवा पाय अगदी टोकाला थांबवलेल्या अवस्थेत आहे. शिवरायांनी घोड्याचा ओढलेला लगाम आणि तत्क्षणी थांबलेला घोडा, अशी चित्तथरारक रचना या पुतळ्याची आहे. प्रसिद्ध शिल्पकार बी. आर. खेडकर यांनी हा पुतळा बनवला आहे.
कावळा नाका येथे शहराच्या सुरुवातीलाच समोर उभा ठाकतो तो करवीर राज्य संस्थापिका ताराराणींसाहेबांचा आवेशपूर्ण अश्वारूढ पुतळा आहे. दोन पायांवर उभा घोडा आणि त्यावर स्वार असलेल्या, छत्रपती ताराराणी. आपल्या उजव्या हातात उचललेली तलवार आणि चेहऱ्यावरील विजयी मुद्रेत शिल्पित केल्या आहेत. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचे थोरले चिरंजीव आणि स्वातंत्र्योत्तर काळातील कोल्हापूरचे प्रसिद्ध चित्र-शिल्पकार रवींद्र मेस्त्री या शिल्पाचे शिल्पकार आहेत. साधारण १४ फूट उंचीचे हे शिल्प घोड्याच्या मागच्या दोन पायांवर स्थिर आहे. या भव्य शिल्पाचे अनावरण १९८१ ला छत्रपती विजयमाला राणीसाहेब यांच्या उपस्थितीत, राज्यपाल ओ. पी. मेहरा यांच्या हस्ते झाले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कोल्हापूर महापालिकेच्या इमारतीसमोरील हा पूर्णाकृती पुतळा. कांस्य धातूमधील या पुतळ्यामध्ये पाश्चिमात्य पद्धतीच्या रुबाबदार पोशाखात बाबासाहेब असून, डाव्या हातात संविधान, तर उजवा हात दिशा दर्शवण्यासाठी वर उचलला आहे. कोटाच्या बाह्यांमधून अगदी नेमकेपणाने शर्टच्या बाह्या हाताजवळ योग्य पद्धतीने दाखवल्या असून, शर्टची कॉलर आणि टाय बोल्ड उठावात दर्शवताना कोट आणि त्यावरचा तपशील कमी उठावात साकारला आहे. ॲड. महादेवराव आडगुळे महापौर असताना या पुतळ्याची संकल्पना पुढे आली. १९८७ मध्ये बिहारचे तत्कालीन राज्यपाल डॉ. आर. डी. भंडारे यांच्या हस्ते पुतळ्याचे लोकार्पण झाले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पहिले स्मारक शिल्प छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत १९२७ मध्ये दसरा चौक येथे उभारण्यात आले. त्या काळातील शिल्पकार रावबहादूर गणपतराव म्हात्रे यांनी बनवलेले हे सुंदर शिल्प. महाराजांचे व्यक्तिमत्त्व साकारताना शिल्पकाराने निवडलेली पोज आणि चेहऱ्यावरील भाव हे शिल्प पाहणाऱ्यांवर सर्वप्रथम प्रभाव टाकतात आणि लक्ष वेधून घेतात. पुतळ्याचा चौथरा खालील बाजूस जाड व वरती थोडा थोडा कमी होत गेला आहे. त्यावर माहिती देणारा शिलाफलक कोरलेला असून, तो इंग्रजी आणि मराठी भाषेत आहे. त्यावर १२ एप्रिल १९२७ रोजी हिज एक्सिलन्सी सर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण केल्याचा उल्लेख आहे.