Manoj Bhalerao
संयुक्त अरब अमिरातीमधील हिंदू समुदायाचे सर्वांत मोठे दगडी मंदिर म्हणून स्वामिनारायण मंदिर ओळखले जाणार आहे. मंदिराच्या भव्यतेबरोबरच त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेचीही सर्वत्र चर्चा होत आहे.
मंदिराला दोन घुमट असून ते शांतता आणि सौहार्द यांचे प्रतीक आहेत. याशिवाय घुमटासारखा आकार असलेले १२ शिखर असून मंदिराला एकूण ४०२ खांब आहेत.
सौहार्द हे प्रतीक असलेल्या घुमटावर पृथ्वी, आप, तेज, जल आणि वायू यांचे चित्र रंगविण्यात आले आहे. या घुमटाची भिंत ही ‘यूएई’मधील थ्री-डी प्रिंट केलेली सर्वांत मोठी भिंत आहे. मंदिराकडे जाण्याच्या मार्गावर ९६ घंटा आणि गोमुख बांधण्यात आले आहेत.
स्वामी महाराजांच्या ९६ वर्षांच्या आयुष्याचे ते निदर्शक असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले. या मंदिरात भव्य गॅलरी, वाचनालय, बगिचे, कारंजे आणि कृत्रिम प्रवाह, फूडकोर्ट, गिफ्ट शॉप, लहान मुलांना खेळण्यासाठी विशेष जागा, एक सांस्कृतिक केंद्र व पाच हजार जणांची क्षमता असलेले दोन सभागृह.
मंदिरात प्रत्येक ठिकाणी रेखीव नक्षीकाम केलेले आहे. संयुक्त अरब अमिराती हा देश सात अमिरातींचा मिळून बनला आहे. त्याचे प्रतीक म्हणून मंदिर परिसरात सात मनोरे उभारण्यात आले आहेत.
हे सात मनोरे श्रीराम, कृष्ण, जगन्नाथ, शिव, स्वामिनारायण (कृष्णाचा अवतार), बालाजी आणि अय्यप्पा अशा सात देवतांना समर्पित केले आहेत. याशिवाय, मंदिरांच्या भिंतींवर उंट आणि ससाणा या ‘यूएई’ची ओळख असलेल्या प्राणी व पक्ष्याच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. याशिवाय, हत्ती, वाघ, सिंह, मोर यांच्याही प्रतिमा कोरलेल्या आहेत.
भिंतींवर रामायण, महाभारत यांतील कथांसह ॲझटेक, माया, इजिप्त, अरेबिक, युरोपियन, चिनी आणि आफ्रिकी संस्कृतीमधील कथाही चित्रित करण्यात आल्या आहेत.
मंदिराचे बांधकाम
मंदिराच्या बाह्य भागासाठी भारतातून आणलेला गुलाबी दगड वापरला असून अंतर्भागात इटालियन संगमरवराचा वापर केलेला आहे. मंदिर उभारणी करताना विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा कल्पक वापर करण्यात आला आहे. लोखंड अथवा पोलादाचाही कोठेही वापर केलेला नाही. प्राचीन भारतीय स्थापत्यशास्त्राचा अभ्यास करून आणि त्यानुसार हे मंदिर बांधण्यात आले आहे.