सकाळ डिजिटल टीम
तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही नैसर्गिक उपचार शोधत असाल, तर रताळे तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतात.
कारण, यामध्ये व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. चला जाणून घेऊया रताळे तुमच्या त्वचेसाठी किती फायदेशीर आहेत?
रताळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे कोलेजनचे उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. कोलेजन हे एक प्रोटीन आहे, जे त्वचेला गुळगुळीत ठेवते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या रोखते.
20 ते 70 वर्षे वयोगटातील पुरुष आणि महिलांवर केलेल्या अभ्यासानुसार असं आढळून आलंय की, कोलेजन त्वचेला हायड्रेट करण्यासाठी आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. जर तुम्ही रोज रताळ्याचे सेवन केले, तर तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊ शकतात.
रताळ्याचा केशरी रंग बीटा-कॅरोटिनपासून येतो, जो अँटिऑक्सिडंटचा चांगला स्रोत मानला जातो. जेव्हा ते तुमच्या शरीरात प्रवेश करते, तेव्हा ते व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते. हे तुमच्या त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते.
बीटा-कॅरोटीन तुमच्या त्वचेला हानिकारक किरणांपासून वाचवण्यासही मदत करते. म्हणजेच, जर तुम्ही तुमच्या आहारात रताळ्याचा समावेश केला तर तुम्ही तुमच्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवू शकता.
रताळ्याला पाण्याचा चांगला स्रोतही मानला जातो. ते तुमच्या त्वचेला ओलावा देते. इतकेच नाही तर रताळ्यामध्ये पोटॅशियम देखील मुबलक प्रमाणात आढळते, जे तुमच्या शरीरातील द्रव पातळी संतुलित ठेवते.