Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाने २९ जून रोजी टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली.
बार्बाडोसला झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत केलं.
मात्र, या विजयानंतर काही दिवस भारतीय संघ बार्बाडोसला असलेल्या चक्रीवादळाच्या धोक्यामुळे तिथेच अडकला होता.
अखेर भारतीय संघ ४ जुलै रोजी पहाटे बीसीसीआयने सोय केलेल्या स्पेशल विमानाने मायदेशी परतला.
मायदेशी परतल्यापासूनच दिवसभर भारतीय संघ विजयोत्सव साजरा करताना दिसला.
दिल्लीत परतल्यानंतर आधी भारतीय संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
मोदी यांच्याबरोबर संवाद साधल्यानंतर भारतीय संघ दुपारी मुंबईकडे रवाना झाला. मुंबईत पोहचल्यानंतरचे दृश्य मात्र थक्क करणारी होती. हजारो चाहत्यांचा ताफा भारतीय संघाचं स्वागत करण्यासाठी सज्ज होता.
मुंबईत परतल्यानंतर नरिमन पाँइंट्स ते वानखेडे स्टेडियम अशी भारतीय संघाची ओपन बसमध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली.
यानंतर वानखेडे स्टेडियमवर भारतीय खेळाडूंचा सत्कार सोहळा झाला, यावेळी संपूर्ण वानखेडे स्टेडियमही चाहत्यांच्या उपस्थितीने भरलेले होते.