Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाने १ ऑक्टोबर २०२४ रोजी बांगलादेश संघाविरुद्ध कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला. या विजयबरोबरच भारताने दोन सामन्यांची मालिकाही २-० फरकाने जिंकली आहे.
कानपूरला मिळवलेला विजय भारताचा कसोटी क्रिकेटमधील १८० वा विजय ठरला.
त्यामुळे कसोटीमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत चौथा क्रमांक मिळवला आहे.
भारताने ५८१ कसोटी सामन्यांमध्ये १८० विजय मिळवले आहेत, तर १७८ पराभव स्वीकारले आहेत. भारताचे २२२ सामने अनिर्णित राहिले आहेत, तर एक सामना बरोबरीत सुटला होता.
पाचव्या क्रमांकावर घसरलेल्या दक्षिण आफ्रिकेने कसोटीत ४६६ सामने खेळताना १७९ विजय मिळवले आहेत, तर १६१ पराभव स्वीकारले आहेत. त्यांचे १२६ सामने अनिर्णित राहिले आहेत.
सर्वाधिक कसोटी विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत अव्वल क्रमांकावर ऑस्ट्रेलिया असून त्यांनी ८६६ कसोटी सामन्यांमध्ये ४१४ विजय मिळवले आहेत. त्यांनी २३२ सामन्यांत पराभव पत्करला आहे, तसेच २१८ सामना अनिर्णित राहिले आहेत, तर २ सामने बरोबरीत सुटले आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंड असून त्यांनी १०७७ सामने खेळले असून ३९७ विजय मिळवले आहेत आणि ३२५ पराभव स्वीकारले आहेत. त्यांचे ३५५ सामने अनिर्णित राहिले आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या वेस्ट इंडिजने ५८० कसोटी सामने खेळताना १८३ विजय मिळवले आहेत आणि २१४ पराभव स्वीकारले आहेत. त्यांचे १८२ सामने अनिर्णित राहिलेत, तर १ सामना बरोबरीत सुटला आहे.
(सर्व आकडेवारी १ ऑक्टोबर २०२४ पर्यंतची)