Monika Lonkar –Kumbhar
निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे, या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत.
मात्र, आजकालचे धकाधकीचे जीवन, बिघडलेला आहार आणि व्यायामाचा अभाव इत्यादी, कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.
रात्री उशिरा जेवण करणे, त्यात फास्टफूडचे वाढलेले सेवन आणि जागरण करणे, इत्यादी कारणांमुळे पोटाच्या समस्यांना आमंत्रण मिळते. मग, पोटात जळजळ होणे, अपचन, पित्त, अॅसिडिटी आणि गॅस तयार होणे इत्यादी समस्या भेडसावू लागतात.
छातीत किंवा पोटात जळजळ असो किंवा पोटात होणारी जळजळ असो, या सर्वांचा आपल्या मनावर आणि मेंदूवर परिणाम होतो.
पोटाशी संबंधित समस्या खास करून उन्हाळ्यात अधिक प्रमाणात होतात. मात्र, याकडे दुर्लक्ष करू नका. या समस्यांवर वेळीच उपचार करा. अन्यथा गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता आणि या समस्यांपासून आराम मिळवू शकता.
काकडीमध्ये भरपूर पाणी आढळते. त्यामुळे, पोटातील जळजळ किंवा पोटाच्या इतर समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काकडीची मदत घेऊ शकता. यामुळे, पोटाला थंडावा मिळतो आणि पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. पोटाला थंडावा देण्यासोबतच पोट शांत ठेवण्याचे काम काकडी करते.
पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कॅल्शिअमयुक्त दही किंवा ताकाचे सेवन करू शकता. आपले अन्न पचवण्यासाठी दही किंवा ताक हे अतिशय उपयुक्त आहे. पोटातील जळजळ थांबवण्यासाठी तुम्ही ताक किंवा दह्याचे सेवन करू शकता.