सकाळ डिजिटल टीम
कितीही नाकारलं तरीही सिनेमा हा सर्वसामान्यांच्या आयुष्यावर खोलवर परिणाम करतो. बॉलिवूडमध्ये ४५ वर्षांपूर्वी एक असा सिनेमा प्रदर्शित झाला ज्यामुळे बायकांनी लाल रंगाचे कपडे खासकरून लग्नात लाल रंगाच्या साड्या नेसणं बंद केलं होतं.
हा सिनेमा होता ७० च्या दशकातील हॉरर सिनेमा जानी दुष्मन. संजीव कुमार, सुनील दत्त, जितेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, विनोद मेहरा, रीना रॉय, रेखा, नीतू सिंह आणि बिंदिया गोस्वामी या कलाकारांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या.
१९७९ साली बनवलेला हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमाचं बजेट १.३. कोटी इतकं होतं.
राजकुमार कोहली यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं आणि या सिनेमाने ९ कोटींची कमाई केली होती. शत्रुघ्न सिन्हा आणि रेखा, नीतू सिंह आणि जितेंद्र या जोड्या त्यावेळी खूप गाजल्या होत्या.
पण या सिनेमातील एका गोष्टीमुळे अनेक मुलींना लग्न करण्याची भीती वाटू लागली तर स्त्रियाही लाला कपडे घालायचं टाळू लागल्या.
या सिनेमात असं दाखवण्यात आलं होतं कि, लग्नासाठी लाल पोशाखात नटलेली नवरी वरातीतून गायब व्हायची आणि तिचा गूढ पद्धतीने मृत्यू व्हायचा. याचा परिणाम असा झाला कि, अनेक मुली लग्नात लाल रंगाचे कपडे नेसण्यास मनाई करू लागल्या.
या सिनेमात असं दाखवण्यात आलं होतं कि, लाल रंग पाहिल्यावर संजीव यांचं रूपांतर एका राक्षसात होतं आणि तो स्त्रियांना खासकरून नववधुंना पळवतो. याचा परिणाम म्हणजे लोकांनी त्यांच्या मुलींच्या लग्नाचे पोशाख लाल ऐवजी गुलाबी किंवा केशरी रंगाचे निवडायला सुरुवात केली.