Pranali Kodre
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आत्तापर्यंत अनेकदा त्याच्या मोठ्या खेळीने भारताला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे त्याला रनमशीन म्हणूनही ओळखले जाते.
मात्र कसोटीमध्ये गेल्या ४ वर्षात विराटची कामगिरी चिंताजनक राहिली आहे. विराटच्या २०१९ पर्यंतच्या आणि २०२० नंतरच्या कामगिरीची तुलना केल्यात त्याच तफावत जाणवत आहे.
विराटने २०१९ पर्यंत कसोटीमध्ये ८४ सामन्यांमध्ये १४१ डावात ५४.९७ च्या सरासरीने ७२०२ धावा केल्या होत्या. यामध्ये २७ शतके आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे.
विराटच्या २०२० नंतरच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले, तर त्याने ३३ सामन्यांमध्ये ५७ डावात ३३.०१ च्या सरासरीने १८१६ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या २ शतकांचा आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे.
त्यातही त्याने गेल्या चार वर्षात सर्वाधिक धावा २०२३ मध्ये केल्या होत्या. त्याने ८ सामन्यांत २ शतकांसह ५५.९१ च्या सरासरीने ६७१ धावा केल्या होत्या.
विराटने २०२४ मध्ये आत्तापर्यंत ५ कसोटीत एकच अर्धशतक केले आहे. तेही त्याने बंगळुरूला न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात केले होते.
विराटची सरासरीही आता ५० हून खाली घसरली असून ४८.४८ अशी झाली आहे.
दरम्यान विराटसह फॅब फोरमध्ये असलेल्या स्टीव्ह स्मिथ, जो रूट आणि केन विलियम्सन यातिघांचीही कामगिरी विराटहून अधिक चांगली गेल्या ४ वर्षात झाली आहे.
२०२० नंतर कसोटीत रुटने ६० सामन्यांमध्ये ५५.२७ च्या सरासरीने १८ शतकांसह ५३६२ धावा केल्या आहेत. स्मिथने ३७ सामन्यांमध्ये ४५.०१ च्या सरासरीने ६ शतकांसह २५२१ धावा केल्या आहेत. विलियम्सनने २४ सामन्यांमध्ये ६४.१५ च्या सरासरीने ११ शतकांसह २५०२ धावा केल्या आहेत.