सकाळ डिजिटल टीम
आहारतज्ज्ञ डॉ. मनाली चौगुले सांगतात, हिवाळा हा आरोग्यासाठी पूरक ऋतू मानला जातो. या ऋतूमध्ये शरीराची पचनशक्ती चांगली असते. त्यामुळे या दिवसांत आहाराकडेही विशेष लक्ष देण्याकडे सगळ्यांचा कल असतो.
या दिवसात जे खाल, ते पचेल, अशी वाक्ये जुनी लोक आजही सांगतात. पावसाळ्यात मंदावलेली पचनशक्ती हिवाळ्यात सुधारते.
या दिवसांत थंडीचा सामना करताना शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी, शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा पुरवताना योग्य व पौष्टिक पदार्थ खाल्ले, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते.
हिवाळ्याच्या आहाराचे नियोजन करताना, तो आहार पौष्टिक असेल; परंतु वजन वाढवणारा नसेल, याची सगळ्यांनीच काळजी घ्यावी.
आपल्याकडे थंडीच्या दिवसात डिंकाचे व सुकामेव्याचे लाडू करायची पद्धत आहे. हे लाडू पौष्टिक असतात. प्रथिने, कॅल्शिअम व लोह हे सारे काही या लाडवांत भरपूर प्रमाणात असते.
थंडीत काहीतरी गरम घेतल्यावर चांगले वाटते. सारखा चहा किंवा कॉफी घेणे आरोग्यासाठी हितकारक नाही. हर्बल टी किंवा ग्रीन टी घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
तुळस, गवती चहा, आले आदींचा काढा घेणे फायद्याचे असते. नेहमीच्या चहात आले घालावे. या दिवसात भाज्यांचे सूप घेतल्यास भरपूर पोषकतत्त्वे मिळू शकतील.
या दिवसांत भाज्या खूप चांगल्या प्रतीच्या व भरपूर प्रमाणात मिळतात. पालेभाज्यांचा तर हा सर्वोत्तम काळ आहे. त्यांचा वापर भरपूर करावा. हिरव्या भाज्यांमध्ये ‘अ’ आणि ‘क’ ही जीवनसत्त्वे असतात.