Pranali Kodre
हरियानाच्या २३ वर्षीय वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज याने रणजी क्रिकेट करंडकातील रोहतक येथे झालेल्या क गटातील केरळ संघाविरुद्धच्या लढतीत ऐतिहासिक कामगिरी केली.
त्याने या सामन्यात एका डावात १० फलंदाज बाद करण्याची किमया करून दाखवली. अंशुल कंबोजने केरळविरुद्धच्या लढतीत ४९ धावा देत १० फलंदाज बाद केले.
रणजी क्रिकेटमध्ये दोन गोलंदाजांनाच अशी कामगिरी करता आली आहे. प्रेमांगसू चॅटर्जी व प्रदीप सुंदरम ही त्यांची नावे.
तसेच प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात १० फलंदाज बाद करणारा तो भारताचा सहावा गोलंदाज ठरला आहे.
यामध्ये सुभाष गुप्ते (१९५४), प्रेमांगसू चॅटर्जी (१९५६-५७), प्रदीप सुंदरम (१९८५-८६), अनिल कुंबळे (१९९९), देबाशिष मोहंती (२००१), अंशुल कंबोज (२०२४) या सहा गोलंदाजांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात १० विकेट्स घेतल्या आहे.
अंशुलचा जन्म हरियानामधीस कर्नाल येथे ६ डिसेंबर २००० रोजी झाला. तो वेगवान गोलंदाजीबरोबर खालच्या फळीत चांगली फलंदाजीही करू शकतो.
अंशुलने २०२२ मध्ये हरियानाकडून वरिष्ठ क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये ३ सामनेही खेळले. ज्यात त्याने मयंक अगरवाल आणि श्रेयस अय्यर यांच्या विकेट्स घेतल्या.
अंशुलने १९ प्रथम श्रेणी सामने खेळले असून ५७ विकेटस घेतल्या आहेत. त्याने १५ लिस्ट ए सामन्यांत २३ विकेट्स घेतल्या आहेत, तर १५ टी२० सामन्यात १७ विकेट्स घेतल्या आहेत.