आशुतोष मसगौंडे
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये आतापर्यंत भारताने एकूण तीन पदके जिंकली आहेत. भारतीय ॲथलीट अविनाश साबळे याने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत पाचव्या स्थानावर राहून अंतिम फेरी गाठली.
अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेस अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.
काही वर्षांपूर्वी अविनाश साबळे याने या पिढीतील भारताचा प्रमुख स्टीपलचेसर म्हणून झपाट्याने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.
13 सप्टेंबर 1994 रोजी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मांडवा गावात जन्मलेला अविनाश मुकुंद साबळे एका सामान्य कुटुंबात वाढला आहे.
त्याचे आई-वडील शेतकरी होते. सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नसल्याने त्याला शाळेत जाण्यासाठी दररोज सहा किलोमीटर धावत जावे लागायचे.
अविनाश साबळेने कधीच स्पोर्ट्समध्ये काही करायची महत्त्वाकांक्षा बाळगली नव्हती. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सैन्यात भरती होण्याचा निर्णय त्याने खूप लवकर घेतला होता.
अविनाश 12 वी पूर्ण केल्यानंतर भारतीय सैन्यात भरती झाला. तो सियाचीन, राजस्थान आणि सिक्कीम येथे तैनात होता.
2015 मध्येच अविनाश सैन्याच्या ऍथलेटिक्स प्रोग्राममध्ये सामील झाल्यानंतर तो स्टीपलचेसबद्दल शिकला.