सकाळ डिजिटल टीम
पवित्र रमजान महिन्याची प्रत्येक मुस्लिम बांधव वर्षभर वाट पाहत असतो. कारण पवित्र कुराणच्या आज्ञेप्रमाणे प्रत्येक सज्ञान मुस्लिम स्त्री-पुरुषाने पवित्र रमजानच्या महिन्यात उपवास, प्रार्थना (५ वेळची नमाज) पवित्र कुराण पठण, जप ध्यान (एतकाफ, जिकर) व रात्रीची विशेष प्रार्थना (तराविहची नमाज) करावयाची असते.
रमजानचा महिना सुरू झाला की, मुस्लिम बांधवांसाठी जणू भक्ती (इबादत) करण्याचा हंगाम सुरू होतो. असे म्हटले जाते की, वर्षातील भले ११ महिने तुम्ही आपला व्वयसाय, नोकरी द्रव्यार्जनासाठी खर्च करा. परंतु रमजान एक महिना मात्र ईश्वरासाठी राखून ठेवायला हवा. अर्थात आजारी माणूस व लहान मुलांना उपवासातून सूट असते.
संकटे आली म्हणजे ईश्वराचा धावा करणाऱ्या स्वार्थी माणसाला यातून फार मोठा धडा घेता येईल. केवळ इबादत (भक्ती) करून जास्तीत जास्त पुण्य संपादन करण्याचा हा महिना आहे. परंतु त्याचबरोबर स्वत: उपवास ठेवून इतरांची भूक आणि तहान यांची जाणीव करून घेण्याचा हा महिना आहे.
केवळ समाजातील दीनदुबळ्या लोकांना, ज्यांना एकवेळचे जेवण मिळत नाही, प्रसंगी त्यांना उपाशी राहावे लागते, अशा लोकांच्या यातना कळाव्यात, हे जीवनाचे महान तत्त्वज्ञान प्रत्येक मुस्लिम धर्मीयांना या उपवासाच्या माध्यमातून समजते.
जाणूनबुजून कुणी मुस्लिम बांधवाने रमजानचे उपवास केले नाहीत व ही संधी त्याच्या आयुष्यातून निसटली तर त्याने पुढे दुप्पट म्हणजे ६० उपवास करायला हवेत, असा शरीयतचा कायदा आहे. उपवास असताना शरीर, मेंदू, मन आणि आत्मा यांचा समन्वय झाला पाहिजे, तरच आत्मशुद्धी हाईल. अन्यथा केवळ उपवास करणे म्हणजे उपाशी पोटी राहणे असा त्याचा अर्थ होईल.
कुणीही उपवासधारक सत्य लपवू शकत नाही व खोटे बोलू शकत नाही किंवा क्रोध आला तरी भांडणतंटा करू शकत नाही. म्हणूनच अनेकवेळा आपण पाहतो की, रमजानच्या पवित्र महिन्यात काही मुस्लिम देश बिनशर्त माघार घेतात व त्यांची खात्री असते की, त्यांना अल्लाहची मदत येईल व शेवटी तेच विजयी होतील. आत्मशुद्धी हाच रमजानच्या उपवासाचा मुख्य हेतू असला पाहिजे.
रमजान महिन्यात उपवासाद्वारे माणसाची सहनशक्ती व संयम यांची वृद्धी होते. शास्त्रशुद्ध पद्धतीने माणसामध्ये असलेले षडरिपू (उदा. काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणी मत्सर यांचा) त्याग करण्याची मानसिकता निर्माण होते. रमजानच्या उपवासासाठी सूर्योदयानंतर व सूर्यास्तापर्यंत काहीही खाता येत नाही. एवढेच नव्हे तर पाणीदेखील पिता येत नाही. आपली कोणतीही कृती परमेश्वर पाहतो, अशी मुस्लिम धर्मीयांची गाढ श्रद्धा असते व त्यामुळे उपवासधारकाचा पाण्याअभावी जीव कासावीस झाला व तो एकटाच आहे, त्याला पाहणारे कुणी नाही, तरीदेखील तो केव्हीही पाणी पिणार नाही. (लेखक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)