जगातील पहिला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणता? स्थापना कोणी केली?

अंकिता खाणे (Ankita Khane)

सध्याचे जग सोशल मीडियाचे आहे. हे सोशल मीडियाचे जग एवढे विस्तारले आहे की, याबद्दल कोणाला माहित नाही? असा व्यक्ती क्वचितच सापडेल.

सुरूवातीला संवादाचे माध्यम म्हणून उदयास आलेला हा सोशल मीडिया आता लोकांची ओळख बनलाय, कमाईचे उत्तम साधन म्हणून आणि मत व्यक्त करण्याचे व्यासपीठ म्हणून ओळखला जातोय.

अल्पावधीतच लोकांनी या सोशल मीडियावरील विविध प्रकारच्या प्लॅटफॉर्म्सला आपलेसे केले असे म्हणायला हरकत नाही. परंतु, जसेजसे तंत्रज्ञान बदलत गेले, तसा त्याचा वापर ही वाढला.

सोशल मीडियाने आपले सर्वांचे जग बदलून टाकले. मात्र, तितकाच त्याचा अतिवापर केल्याने दुष्परिणाम ही वाढले आहेत. हे आपल्याला मान्य करावे लागेल.

सोशल मीडियाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहाचावी या उद्देशाने ‘जागतिक सोशल मीडिया दिनाची’ सुरूवात करण्यात आली. जगभरात दरवर्षी ३० जून हा दिवस जागतिक सोशल मीडिया दिन म्हणून साजरा केला जातो.

सध्या जगभरात अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. परंतु, जगातील सर्वात पहिले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणते? याबद्दल तुम्हाला माहित आहे का? आज सोशल मीडिया दिनानिमित्त या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात.

जगातील पहिले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणते?

तुमच्यातील अनेकांना हे माहित असेल की, फेसबुक हे जगातील पहिले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. परंतु, हे साफ चुकीचे आहे. खरे तर जगातील सर्वात पहिले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे सिक्सडिग्रीज (Sixdegrees) होते.

या प्लॅटफॉर्मची स्थापना अ‍ॅड्र्यू वेनरीच (Andrew Weinreich) यांनी केली होती. सिक्सडिग्रीज हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म १९९७ मध्ये लाँच करण्यात आले होते.

परंतु, २००१ मध्ये या प्लॅटफॉर्मवर तब्बल १० लाखांहून अधिक वापरकर्ते असताना ते अचानक बंद करण्यात आले.

या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे जगभरातील वापरकर्त्यांना त्यांचे मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबियांशी कनेक्ट होण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे या प्लॅटफॉर्मवर बुलेटिन बोर्ड, स्कूल एफिलिएशन आणि प्रोफाईलचे मनोरंजक फिचर्स उपलब्ध होते.

जागतिक सोशल मीडिया दिनाची सुरूवात

जागतिक सोशल मीडिया दिन हा जगभरात पहिल्यांदा ३० जून २०१० रोजी साजरा करण्यात आला होता. मॅशेबल या टेक्नॉलॉजीवर आधारित गोष्टींची माहिती देणारी एक वेबसाईट यासाठी कारणीभूत आहे.

या वेबसाईटनेच ३० जून २०१० रोजी जागतिक सोशल मीडिया दिन साजरा केला होता. त्यावेळी, लोकांमध्ये सोशल मीडियाचा फारसा प्रभाव नव्हता.

त्यामुळे, सोशल मीडियाचा प्रसार जगभरातील लोकांपर्यंत व्हावा आणि जागतिक संवादात त्याचा प्रभाव आणि त्याची भूमिका अधोरेखित करण्याच्या हेतूने हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला. जो आजतागायत साजरा केला जात आहे.

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

tea
येथे क्लिक करा