Aishwarya Musale
दुधामध्ये असलेले कॅल्शियम आणि इतर पोषक तत्व आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. केवळ लहान मुलेच नाही तर मोठ्यांनी देखील आपल्या दररोजच्या आहारामध्ये दुधाचा समावेश करायला हवा.
बहुतेक लोकांना रात्री दूध प्यायला आवडते. तर काही असे आहेत जे सकाळी नाश्त्यात दूध पितात. कॅल्शियम, प्रथिने, व्हिटॅमिन ए, बी6, डी, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयोडीन यांसारखे पोषक घटक दुधात आढळतात.
दूध हे पौष्टिकतेचे उत्तम स्रोत मानले जाते. मात्र, काही पदार्थाचे दूधासोबत सेवन करणे टाळले पाहिजे. हे पदार्थ नेमके कोणते याबद्दल आपण जाणून घेऊयात.
उडदाची डाळ खाल्यानंतर लगेचच दूध पिणे टाळा. तज्ज्ञांच्या मते, यामुळे आपल्या शरीराला हानी होऊ शकते. उडीद डाळ दुधासोबत खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.
आयुर्वेदानुसार, दुधाबरोबर दह्याचे कधीही सेवन करू नये. तसेच, दूध प्यायल्यानंतर दहीही खाऊ नये. कारण ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे तुम्हाला पोटाची समस्या होऊ शकते.
दुध पिताना कधीही आंबट फळे खाऊ नये. तसेच, केळीसह दुधाचे सेवन चांगले नाही. दूध आणि केळीचे एकत्र सेवन केल्याने कफची समस्या निर्माण होते.
बरेच लोक दुधात गूळ घालतात. आरोग्यासाठी गूळ अनेक प्रकारे फायदेशीर आहे यात शंका नाही. पण, आयुर्वेदात दूध आणि गुळाचे एकत्र सेवन करणे हानिकारक मानले गेले आहे. यामुळे तुमचे पोट खराब होऊ शकते.
जर तुम्ही दुधाबरोबर मसालेदार पदार्थ खात असाल तर आतापासून तसं करणं थांबवा. कारण यामुळे अॅसिड रिफ्लक्सचा धोका तसेच अपचनाचा त्रास होऊ शकतो.