आशुतोष मसगौंडे
51 वर्षीय तुर्किश एअर पिस्तूल नेमबाज युसुफ डिकेक यांनी 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर ते सोशल मीडियाचे नवे सेन्शेशन ठरत आहेत.
सामन्यावेळी त्यांनी खिशात एका हात तर पिस्तूलीवर एक हात ठेवत कमीत कमी उपकरणांसह लक्ष्य साध्य केलेला त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इतर स्पर्धकांनी वापरलेल्या हाय-टेक उपकरणांच्या विरूद्ध, प्रिस्क्रिप्शन ग्लासेस आणि बेसिक इअरप्लग घातलेल्या Dikec यांच्या फोटोला एक्स प्लॅटफॉर्मवर तब्बल 68 दशलक्ष व्हिव्ज मिळाले आहेत.
एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत डिकेक यांचा किट त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि साधा होता. तर त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनी स्पेशल गॉगल्स, अँटी-ब्लर लेन्स आणि नॉईज प्रोटेक्टींग एअरप्लग्ज घातले होते.
साधे वागणे आणि प्रभावी कामगिरीमुळे, डिकेक यांच्यावर सोशल मीडियावर अनेक मीम्स तयार होत आहेत.
काहींनी सोशल मीडियावर विनोदाने म्हटले की, तुर्कीने कदाचित त्यांच्या गुप्त एजंटला ऑलिम्पिकमध्ये पाठवले असावे, हा संशय टाळण्यासाठी डिकेक यांनी जाणूनबुजून गोल्ड मेडेल जिंकले नसावे.
अंतिम फेरीत, सर्बियाच्या झोराना अरुनोविक आणि दामिर माइकेक यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले, त्यांनी तुर्कीच्या डिकेक आणि सेव्हल इलायदा तरहान यांचा 16-14 असा पराभव केला.
भारताच्या मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी दक्षिण कोरियाच्या ओह ये-जिन आणि ली वोन-हो या जोडीवर 16-10 अशी मात करून कांस्यपदक मिळवले.