अर्थभान : ही ‘सुवर्ण’संधी साधायची?

Gold
Gold
Updated on

मार्च २०२० पासून कोव्हिड-१९ च्या महासाथीने जगभर उग्र रूप धारण करण्यास सुरवात केली होती. ‘लॉकडाउन’मुळे उद्योग-धंदे बंद पडू लागले होते आणि त्यामुळे रोजगाराच्या संधी घटत होत्या. त्यामुळे जागतिक पातळीवर सोन्याच्या भावात मार्च २०२० पासून वाढ होण्यास सुरवात झाली. मार्च २०२० च्या मध्यात प्रति औंस १५२० डॉलरवर असणारे सोने २०७० डॉलरपर्यंत पोचले होते. भारताच्या रुपयाचे विनिमय मूल्य डॉलरच्या तुलनेत ७५ च्या पातळीवर पोचले होते. या सर्व कारणांमुळे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव भारतात प्रति १० ग्रॅमला ५६ हजार रुपयांवर गेला होता.

सध्याचा विचार करायचा झाल्यास सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ४४ ते ४५ हजार रुपयांच्या आसपास आहे. सोन्याचा भाव एवढा खाली कशामुळे आला, सोन्याचे मूल्य कमी झाले, की सोन्यामधील गुंतवणुकीतील लोकांचा रस कमी झाला, असे प्रश्न प्रत्येकालाच पडले असतील. सोन्यात गुंतवणूक कशामुळे होते, हे आधी लक्षात घेतले पाहिजे. जोखीम कमी करण्यासाठी सोन्यात गुंतवणूक होते वा त्यात खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. कोव्हिडच्या महासाथीमुळे जोखीम वाढली असल्याने लोकांचा कल सोन्यातील गुंतवणुकीकडे होता. पण, जोखमी कमी होण्यास सुरवात झाल्यावर लोकांचा सोन्यातील रसही कमी होऊ लागला. त्यामुळे ऑगस्ट २०२० मध्ये प्रति औंस २०७० डॉलरवर पोचलेले सोने नुकतेच १६८० डॉलरच्या खालच्या पातळीवर आणि भारतात ‘एमसीएक्स’वर प्रति १० ग्रॅमला ४३,९०० रुपयांच्या पातळीवर आले होते. सोन्याचा हजर बाजारातील भाव ४४,२०० ते ४४,३०० रुपयांजवळ आला आहे.

परिस्थिती सुधारू लागली
कोव्हिड-१९ मुळे अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान भरून निघण्यास खूप कालावधी लागेल, असेच कयास बांधले जात होते. प्रत्यक्षात सप्टेंबर २०२० पासून औद्योगिक स्थिती, रोजगारसंधी यात झपाट्याने सुधारणा दिसू लागली. परिस्थितीत सुधारणा होण्याबरोबर अस्थिरता कमी होण्यास सुरवात झाली, भीतीचे वातावरण कमी होऊ लागले, लोकांची क्रयशक्ती वाढण्यास सुरवात झाली. या सर्व कारणांमुळे लोकांचा सोन्यातील रस कमी होऊ लागला. लोकांची भीती कमी होण्यास सुरवात झाल्यावर हजर सोन्याची मागणी कमी झाली. आकडेवारी पाहिल्यास, जुलै २०२० पासून एकाही मध्यवर्ती बँकेने सोने खरेदी केलेले नाही. मध्यवर्ती बँकांकडून मागणी न आल्याने बाजारातून मोठ्या प्रमाणात हजर सोने बाहेर गेलेच नाही. मात्र, पुरवठा तेवढाच राहिला. अमेरिकेच्या बाँड मार्केटचा परिणाम सोन्याच्या भावावर झाला. अमेरिकेत ‘स्टिम्युलस’ दिल्यास बाँड मार्केट गडगडेल, ‘रिटर्न’ शून्य टक्क्याजवळ येतील, असे अनेकांना वाटत होते. पण, घडले मात्र वेगळेच! लोकांनी सोने खरेदी न करता डॉलरमधील १० वर्षे मुदतीचे बाँड खरेदी करण्याचा सपाटा लावला. परिणामी, त्या ठिकाणी बाँडवरील व्याज वाढत गेले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या मोठी तेजी नाही
बाँडचे ‘यिल्ड’ अर्थात व्याज कमी होणार नाही, ते एक टक्क्याच्या खाली येत नाही, चलनमूल्य मजबूत होत नाही व बाँड कमकुवत होत नाही, तोपर्यंत सोन्याच्या भावात तेजी येण्याची शक्यता कमी आहे. लोकांचा कल बाँड, शेअर बाजाराच्या गुंतवणुकीकडे राहिल्यास सोन्यात गुंतवणूक येण्याचे प्रमाण कमी राहणार. परिणामी, सोन्याचा भाव पुन्हा लगेच वाढण्याची शक्यता कमी आहे. भारतात सोन्यावर परिणाम करणारे दोन घटक म्हणजे जागतिक पातळीवरील भाव व रुपया-डॉलरचे विनिमय मूल्य. जागतिक पातळीवर २०७० डॉलरवर असणारा सोन्याचा भाव घटून १७०० डॉलर पातळीवर आला. म्हणजे सोन्याचा भाव सुमारे १५ टक्के घसरला, तर डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होऊन ७५.५० पातळीवरून ७२.२० या नजीकच्या नीचांकी पातळीवर आला. रुपया कमकुवत होत नाही वा डॉलर मजूबत होत नाही आणि जागतिक पातळीवर सोन्याचा डॉलरच्या मूल्यात भाव सुधारत नाही, तोपर्यंत भारतात सोन्यात मोठी तेजी येण्याची शक्यता कमी आहे.

सोने ही दीर्घकालीन गुंतवणूक
सोन्यातील गुंतवणूक ही दीर्घकालीन असली पाहिजे. गेल्या १५-१६ वर्षांत सोन्यावर दरवर्षी १५-१६ टक्के परतावा मिळाला आहे. सध्याच्या भावपातळीपासून डिसेंबर २०२२ पर्यंतचा विचार करून सोन्यात गुंतवणूक केल्यास बँकांतील ठेवींपेक्षा चांगला परतावा मिळू शकतो. सोने सध्या घसरले आहे. पण, अन्य बाजारांत (शेअर, बाँड आदी) मंदीची शक्यता निर्माण झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा सोन्याला होणार आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे.

(लेखक पीएनजी अँड सन्सचे संचालक-सीईओ आहेत.)

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.