Digital Wallet : डिजिटल वॉलेट

आपण वापरासाठी लागणारी रक्कम आपले पैशांचे पाकीट किंवा आपली पर्स यात ठेवतो. इंटरनेटवरच्या व्यवहारांसाठी आपल्याला अर्थातच रोकड रक्कम वापरणे जवळपास अशक्य असते.
Digital Wallet
Digital WalletSakal
Updated on

Digital Wallet: आपण वापरासाठी लागणारी रक्कम आपले पैशांचे पाकीट किंवा आपली पर्स यात ठेवतो. इंटरनेटवरच्या व्यवहारांसाठी आपल्याला अर्थातच रोकड रक्कम वापरणे जवळपास अशक्य असते. साहजिकच अशा व्यवहारांसाठी आपण बॅंक खाती, युपीआय, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड अशा सोयी वापरू शकतो.

याखेरीस आपल्यासमोर उपलब्ध असलेला एक पर्याय ‘डिजिटल वॉलेट’चा असतो. जसे आपले पाकीट आपल्या खिशात असते, तसे आपले हे जणू इंटरनेटवरचे पाकीटच असते. इंटरनेटवरच्या या पाकिटामधील पैसे आपण ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरू शकतो.

अनेक कंपन्या अशा प्रकारच्या ‘डिजिटल वॉलेट’चा पर्याय आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देतात. म्हणजेच आपली इंटरनेटवरची थोडी रक्कम आपण अशा ‘डिजिटल वॉलेट’मध्ये ठेवू शकतो. जेव्हा गरज भासेल तेव्हा आपण ती तिथून काढून आपल्या व्यवहारांमध्ये वापरू शकतो.

पेटीएम, फोनपे, गुगलपे अशांसारख्या कंपन्या अशा प्रकारची ‘डिजिटल वॉलेट’ ग्राहकाला पुरवतात. त्यामुळे इंटरनेटवरचे आर्थिक व्यवहार करताना आपल्याला दर वेळी आपल्या खात्यातून पैसे भरण्याची कसरत करावी लागत नाही.

अर्थात या ‘डिजिटल वॉलेट’मध्ये पैसे ठेवले तर त्यावर आपल्याला कोणतेही व्याज मिळत नसल्यामुळे आपण तिथे फार रक्कम ठेवू नये. जसे आपण आपल्या अल्पकालीन गरजा भागतील एवढीच रक्कम काढून आपल्या पाकिटात ठेवतो, तसाच हा प्रकार समजावा.

आपल्या ‘डिजिटल वॉलेट’मधील पैसे सुरक्षित राहतील का, अशी एक भीती आपल्याला वाटणे स्वाभाविक आहे. खरे म्हणजे अशी भीती बाळगण्याची गरज नसते. याचे कारण म्हणजे आपल्या ‘डिजिटल वॉलेट’ खात्यामधील व्यवहारांची तपशीलवार नोंद संबंधित वेबसाइटवर किंवा अॅपवर उपलब्ध असते.

तसेच आपल्याला हवे असेल तेव्हा हे तपशील डाऊनलोड करून साठवूनही ठेवता येतात. या कंपन्या तशा आकाराने मोठ्या आणि आर्थिकदृष्ट्या सुदृढ असल्यामुळे; तसेच त्यांच्या व्यवहारांवर सरकारी नियमांचा अंकुश असल्यामुळे त्यात गैरप्रकार होण्याचा फारसा प्रश्न उद्भवत नाही. यामुळे आपण त्या बाबतीत निर्धास्त राहायला हरकत नाही.

‘डिजिटल वॉलेट’ ही आजच्या काळाशी सुसंगत असलेली सोय असली तरी वर उल्लेख केल्याप्रमाणे त्यामध्ये आपले पैसे बिनव्याजी अडकून राहणे, हा त्यांच्यामधील मोठा दोष आहे. म्हणूनच त्यामध्ये मोठ्या रकमा ठेवण्याची चूक करू नये. आपल्या गरजांनुसार अगदी मर्यादित रक्कम त्यात ठेवल्याने आपली सोय तर होतेच; पण शिवाय आपले नुकसानही होत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.