फिनटेक : नवबॅंका

‘बॅंक’ हा शब्द ऐकल्याबरोबर आपल्यासमोर आपल्या बॅंकेची शाखा येते. तसेच या शाखेमध्ये बसलेले बॅंकेचे कर्मचारी, आपापली कामे करायला आलेले लोक, तिथे सुरू असलेली लगबग
Nio Bank
Nio BankSakal
Updated on

‘बॅंक’ हा शब्द ऐकल्याबरोबर आपल्यासमोर आपल्या बॅंकेची शाखा येते. तसेच या शाखेमध्ये बसलेले बॅंकेचे कर्मचारी, आपापली कामे करायला आलेले लोक, तिथे सुरू असलेली लगबग, टोकन, निरनिराळे फॉर्म अशा असंख्य गोष्टी आपल्या नजरेसमोर यायला लागतात. यातील काहीही नसलेली बॅंक असेल तर? असे कसे शक्य आहे; असे आपल्या मनात येईल. ‘फिनटेक’च्या तंत्रज्ञानामुळे मात्र आता अशी बॅंक उभे करणे शक्य आहे. ही निव्वळ संकल्पनेमधील गोष्ट नसून, अशा प्रकारच्या बॅंका आता उभ्याही राहिलेल्या आहेत. अशा बॅंकाना ‘निओबॅंक’ म्हणून ओळखले जाते. मराठीमध्ये आपण तिला ‘नवबॅंक’ म्हणू शकतो.

ही नवबॅंक असते तरी कशी?

ही बॅंक फक्त आभासी रूपात असते. म्हणजेच तिचे सर्व कामकाज पूर्णपणे इंटरनेटवरूनच सुरू राहते. तिची कोठेही शाखा नसते. तिचे जे काही कर्मचारी असतील, ते घरून किंवा फार तर एखाद्या कार्यालयामधून काम करतात. साहजिकच, आपण अशा बॅंकेच्या शाखेत जाऊन पैसे काढणे किंवा भरणे, चेक देणे, कर्ज घेणे असे कोणतेच व्यवहार करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आपले बॅंक खाते काढण्यापासून वेळप्रसंगी ते बंद करेपर्यंतचे सर्व व्यवहार पूर्णत: इंटरनेटवरूनच होतात. यासाठीच्या सर्व सोयी बॅंकेने तिची वेबसाइट; तसेच तिचे मोबाइल अॅप यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या असतात. साहजिकच, कोणत्याही तंत्रस्नेही माणसाला अक्षरश: बसल्या जागी बॅंकेचे सर्व व्यवहार करता येतात. यामुळे बॅंकेमध्ये जाऊन जरा चार गप्पा मारण्याची मजा अर्थातच हिरावून घेतली जाते; पण सोयींच्या बाबतीमध्ये मात्र प्रचंड वाढ होते.

ऑस्ट्रेलियात ‘व्होल्ट’ बॅंक

ऑस्ट्रेलियामध्ये ‘व्होल्ट’ नावाची बॅंक अशाच संकल्पनेवर आधारलेली आहे. या बॅंकेच्या कामकाजाचा आराखडा आखल्यापासून तिचे कामकाज सुरू होईपर्यंत फक्त तीन वर्षांचा काळ गेला. भविष्यात अशा प्रकारच्या बॅंका तर आणखी खूप कमी काळात सुरू होतील; कारण आता व्होल्ट बॅंकेचे उदाहरण आपल्यासमोर आहे. एकदम धडाक्यात सुरवात करून अडचणीत येण्यापेक्षा या बॅंकेने सावधपणे पावले टाकण्याचे धोरण स्वीकारले आणि आता ती आपले पाय पक्के रोवताना दिसते. इतर बॅंकांना लागू असलेले सर्व नियम अशा प्रकारच्या नवबॅंकांना बंधनकारक असतात. म्हणजेच भारतात जेव्हा अशा नवबॅंका आपले कामकाज सुरू करतील, तेव्हा रिझर्व्ह बॅंकेची नियमावली त्यांना लागू असेल. अर्थातच ‘पेमेंट बॅंक’ या नावाने भारतात हे प्रयोग गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेलेच आहेत; त्यांची व्याप्ती आता अजून बरीच वाढेल, असे आपण म्हणू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.