‘क्रिप्टोकरन्सी’चे अद्‍भुत विश्व

Bitcoin
Bitcoin
Updated on

बिटकॉइन या चलनाने अलीकडच्या काळात नुसता धुमाकूळ घातलेला आहे. एका बिटकॉइनची किंमत ३४,००० अमेरिकी डॉलर म्हणजे साधारण २५ लाख रुपयांच्या घरात जाऊन पोचल्यामुळे अनेक जण आपण बिटकॉइनमध्ये गुंतवणूक न केल्याबद्दल हळहळताना दिसतात. बिटकॉइन हे ‘क्रिप्टोकरन्सी’चे सर्वांत यशस्वी आणि गाजलेले उदाहरण आहे. यामुळे ‘क्रिप्टोकरन्सी’बद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. फक्त संगणकीय यंत्रणा वापरून केले जाणारे चलनाचे व्यवहार म्हणजे ‘क्रिप्टोकरन्सी’ असे आपण ढोबळमानाने म्हणू शकतो. हे चलन आणि त्यामधील सर्व व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी ‘च’ ची भाषा अर्थात ‘क्रिप्टोग्राफी’चा वापर होत असल्यामुळे ‘क्रिप्टो’ (सुरक्षा) आणि ‘करन्सी’ (चलन) या दोन शब्दांमधून ‘क्रिप्टोकरन्सी’ हा शब्द तयार झाला आहे.

सर्वसामान्यपणे ‘पैसा’ हा शब्द ऐकल्यावर आपल्यासमोर नाणी, नोटा, बॅंक खाते, चेकबुक अशा गोष्टी येतात. आताच्या या आधुनिक संगणकीय चलनामध्ये मात्र यातील काहीच नसते. म्हणूनच हे आभासी चलन असते. त्याचे अस्तित्व फक्त संगणकीय यंत्रणांमध्येच असते. त्याच्याबाहेर या चलनाला काहीच अर्थ नसतो. म्हणजेच आपल्याला एक ‘बिटकॉइन’ विकत घ्यायचा असल्यास त्यासाठी आपल्याला संगणकीय यंत्रणाच वापरावी लागेल. जसे आपण नोटा आणि नाणी आपल्या पैशांच्या पाकिटात किंवा पर्समध्ये बाळगतो; त्याच धर्तीवर आपण हे आभासी चलन आभासी पाकिटात बाळगतो. हे आभासी चलन म्हणजे संगणकीय यंत्रणांमधील ‘वॉलेट’ असते. जसा आपण आपला इ-मेल आयडी तयार करून आपले इंटरनेटवरचे आभासी अस्तित्व निर्माण करतो, तसेच आपले वॉलेटही आपली आभासी चलनाच्या दुनियेतील ओळख असते. आपले आभासी पैसे याच वॉलेटमध्ये असतात. असे प्रत्येकाचे स्वतंत्र वॉलेट असते आणि आपण दुसऱ्‍याला आभासी पैसे पाठवले, तर त्या माणसाच्या वॉलेटच्या शिल्लक रकमेत भर पडते.

‘क्रिप्टोकरन्सी’ची संकल्पना उदयाला आल्यापासून अनेक आभासी चलने अस्तित्वात आलेली आहेत. भारतातही त्यांचे व्यवहार सुरू असतात. त्याविषयी सरकार आणि रिझर्व्ह बॅंक यांची भूमिका काहीशी संदिग्ध असल्यामुळे आभासी चलनाचे हे व्यवहार कायदेशीर आहेत का नाही, याविषयी वादविवाद झाले आहेत. हा भूतकाळ असला तरी ‘क्रिप्टोकरन्सी’ या संकल्पनेचे भविष्य खूप उज्ज्वल आहे, यात शंका नाही. अनेक देश आणि ‘फेसबुक’सारख्या महाबलाढ्य कंपन्या आपापली स्वतंत्र आभासी चलने जारी करण्याच्या बेतात आहेत. यामुळे ‘क्रिप्टोकरन्सी’ हे उद्याच्या चलनांपैकी एक अग्रगण्य चलन असणार, हे नक्की!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.