आपले क्रेडिट कार्ड ऑनलाइन प्रकारच्या व्यवहारांमध्ये जेव्हा आपण वापरतो, तेव्हा अनेक वेळा आपल्या मनामध्ये आपल्या कार्डासंबंधीचे तपशील चोरीला जाण्याची एक अनामिक भीती असते. इंटरनेटवरचे भामटे हे तपशील चोरतील आणि त्यांचा गैरवापर करून आपल्याला त्याचा फटका बसण्यासारखे उद्योग करतील, ही भीती अजिबातच अनाठायी नाही. अनेकदा आपण अशा प्रकारच्या अडचणींचा सामना कराव्या लागलेल्या लोकांच्या उदाहरणांसंबंधी वाचतो. यातून मार्ग काढण्याचा एक उपाय म्हणून ‘कार्ड ऑन फाइल’ या संकल्पनेकडे बघितले जाते. त्याविषयी नव्याने नियमावली जारी करण्यात आलेली असल्यामुळे हा विषय नीटपणे समजून घेणे गरजेचे आहे.
आपण ज्या वेबसाइट्सवर नेहमी क्रेडिट कार्डांचे व्यवहार करतो. त्या वेबसाइट्सवर आपण दरवेळी आपल्या क्रेडिट कार्डाची माहिती कशाला भरायची, असा विचार काही वर्षांपूर्वी पुढे आला. म्हणजेच जेव्हा आपण त्या वेबसाइटवर पहिल्यांदा व्यवहार करू, तेव्हा आपल्या क्रेडिट कार्डाचे तपशील ही वेबसाइट नोंदवून ठेवेल आणि त्यानंतर त्या वेबसाइटवर पुन्हा आपले क्रेडिट कार्ड वापरण्याची वेळ जेव्हा येईल, तेव्हा नव्याने हे तपशील भरावे न लागता आधीच्याच नोंदवलेल्या तपशीलांच्या आधारे ही वेबसाइट आपल्याला आपला क्रेडिट कार्डाचा व्यवहार पूर्ण करू देईल; असा याचा अर्थ होता. अर्थातच आपल्या क्रेडिट कार्डासंबंधीची सर्व माहिती अशा प्रकारे एखाद्या वेबसाइटने स्वत:कडे ठेवणेही धोक्याचे आहे, याची काही लोकांना जाणीव होती.
आर्थिक नियमन करणाऱ्या संस्थांना आणि रिझर्व्ह बॅंकेला याची कल्पना असल्यामुळे त्यासंबंधी काही निकष घालून देण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, आपल्या क्रेडिट कार्डासंबंधीचे तपशील एखादी वेबसाइट स्वत:कडे नोंदवून ठेवत असेल तर तिने आपल्या क्रेडिट कार्डचा तीन अंकी ‘सीव्हीव्ही’ हा परवलीचा आकडा नोंदवून ठेवता कामा नये, अशी अट त्यात घालण्यात आली. म्हणजेच सीव्हीव्ही हा आकडा सोडून इतर सगळे तपशील संबंधित वेबसाइट नोंदवून ठेवू शकत असे. साहजिकच आपण त्या वेबसाइटवर पुन्हा एकदा व्यवहार करण्याच्या वेळी ती इतर तपशील आपल्याला मागत नसे; फक्त सीसीव्हीव्ही मागत असे.
अशा प्रकारे सीसीव्हीव्ही वगळता आपल्या क्रेडिट कार्डाचे इतर तपशील संबंधित वेबसाइटकडे नोंदवून ठेवलेले असल्यामुळे या संकल्पनेला ‘कार्ड ऑन फाईल’ असे म्हणतात. म्हणजेच त्या वेबसाइटच्या फाईलमध्येच जणू हे तपशील असतात. अलीकडे रिझर्व्ह बॅंकेने या संदर्भात केलेल्या महत्त्वाच्या बदलांविषयी पुढच्या वेळी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.