नव्या आर्थिक वर्षाची सुरुवातच एका धमाकेदार घोषणेने झाली. एचडीएफसी लि.चे अध्यक्ष दीपक पारेख यांनी गेल्या सोमवारी जाहीर केले, की गेली ४५ वर्षे ९० लाख भारतीयांना स्वतःचे हक्काचे घर घेण्यास मदत करणारी एचडीएफसी लि. ही संस्था एचडीएफसी बॅंक या आपल्या उपकंपनीमध्ये विलीन होणार आहे!
नव्या आर्थिक वर्षाची सुरुवातच एका धमाकेदार घोषणेने झाली. एचडीएफसी लि.चे अध्यक्ष दीपक पारेख यांनी गेल्या सोमवारी जाहीर केले, की गेली ४५ वर्षे ९० लाख भारतीयांना स्वतःचे हक्काचे घर घेण्यास मदत करणारी एचडीएफसी लि. ही संस्था एचडीएफसी बॅंक या आपल्या उपकंपनीमध्ये विलीन होणार आहे! या एकत्रीकरणाची गेली कित्येक वर्षे चर्चा चालू होती. परंतु सध्याची नियमन आणि नियंत्रणाची अनुकूल परिस्थिती विचारात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला. आयएलएफएस, दिवाण हाउसिंग आदी बिगरबॅंकिंग वित्तीय कंपन्या अडचणीत आल्याने रिझर्व्ह बँकेने मोठ्या बिगरबॅंकिंग वित्तीय कंपन्यांचे नियमन कठोर करून त्यांनी बॅंकांमध्ये रूपांतरित व्हावे, असे सुचविले आहे. हे विचारात घेता हा निर्णय योग्य वाटतो.
विशेष म्हणजे एचडीएफसी लि. व एचडीएफसी बॅंक आपापल्या क्षेत्रातील दिग्गज कंपन्या असल्याने हे ‘मर्जर ऑफ इक्वल्स’ असल्याचे दीपक पारेख यांनी म्हटले आहे. एचडीएफसी लि.च्या ₹ २ दर्शनी मूल्यांच्या २५ शेअरच्या बदल्यात एचडीएफसी बँकेचे ₹ १ दर्शनी मूल्य असलेले ४२ शेअर देण्यात येणार आहेत, असे जाहीर करण्यात आले. ही बातमी ऐकताच शेअर बाजारात उत्साह संचारला आणि दोन्ही कंपन्यांचे शेअर सुमारे १० टक्के वाढले. चार एप्रिल २०२२ रोजी बाजार बंद होताना एचडीएफसी लि. १६ टक्क्यांनी, तर एचडीएफसी बॅंक १४ टक्क्यांनी वाढला. या दोन कंपन्या एकत्र आल्या, की भारतातील मार्केट कॅपिटलायझेशनप्रमाणे तीन नंबरची कंपनी अस्तित्वात येईल, जिचे निफ्टी निर्देशांकात सर्वांत अधिक वजन असेल. एकत्रीकरणाच्या प्रक्रियेला १२ ते १८ महिने लागू शकतात, हे समजल्यावर मात्र दोन्ही शेअरच्या भावात दुसऱ्या दिवसापासून घसरण सुरू झाली.
या ‘मेगा मर्जर’च्या निमित्ताने सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालेल्या काही ठळक प्रश्नांना उत्तरे देण्याचा हा प्रयत्न-
हे मर्जर किंवा एकत्रीकरण आताच का?
उत्तर : वर उल्लेख केल्याप्रमाणे, गेल्या २-३ वर्षांत काही एनबीएफसी अडचणीत आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने मोठ्या एनबीएफसींचे नियमन बँकांसारखेच करण्यास सुरवात केली आहे. उदाहरणार्थ, तरलता किती असावी, बुडीत खात्यांचे वर्गीकरण कसे करावे, मोठ्या कर्जदारांची नियंत्रण कसे करावे, तंत्रज्ञान कोणते वापरावे आदी. त्यामुळे एचडीएफसी लि.चे रूपांतर बँकेत करणे गरजेचे झाले होते.
या एकत्रीकरणाचा एचडीएफसी लि.ला काय मुख्य फायदा होणार?
उत्तर : एचडीएफसी लि.कडे चालू खाती, बचत खाती म्हणजे ‘कासा’ नसल्याने त्यांचा व्याजाचा खर्च जास्त आहे. एकत्रीकरणानंतर तो खर्च कमी होईल.
एचडीएफसी बँकेला काय मुख्य फायदा होणार?
उत्तर : एचडीएफसी लि.कडे गृहकर्ज देण्याचा ४५ वर्षांचा अनुभव आणि कौशल्य आहे, ज्याचा फायदा बँकेला मिळेल. सध्या एचडीएफसी बँकेच्या एकूण कर्जापैकी फक्त ११ टक्के गृहकर्जे आहे. एकत्रीकरणानंतर हा हिस्सा खूपच वाढेल. सध्या एचडीएफसी बँकेचे अनेक ग्राहक इतर बॅंकांकडून किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतात. ते आता एकत्रित वित्तीय संस्थेकडून घेतील, अशी आशा आहे.
एचडीएफसीच्या फक्त ३० टक्के ग्राहकांची खाती एचडीएफसी बॅंकेत आहेत. त्यामुळे ‘क्रॉस सेलिंग’चा फायदा दोन्ही संस्थांना होऊ शकतो. एकत्रित संस्थेचे ‘लोन बुक’ १८ लाख कोटी रुपयांपर्यंत पोचेल व त्यांचा बाजारहिस्सा ११ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर जाईल. स्टेट बँकेनंतर यांचाच नंबर लागेल. दोन्ही कंपन्यांचे बुडीत कर्जांचे प्रमाण खूपच कमी आहे.
एचडीएफसी बँकेला काही तोटा होईल का?
उत्तर : एकत्रित संस्थेला सीआरआर, एसएलआर आणि प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगची बंधने पाळावी लागल्याने व त्यावरील परतावा कमी असल्याने नफ्यावर परिणाम होऊ शकतो.
एचडीएफसीच्या उप कंपन्यांचे काय होणार?
उत्तर : एचडीएफसी लाइफ, एचडीएफसी अर्गो, एचडीएफसी एएमसी म्हणजे म्युच्युअल फंड आदी उपकंपन्या एकत्रीकरणानंतर एचडीएफसी बँकेच्या उपकंपन्या होतील.
मी आता एचडीएफसी लि.चे शेअर खरेदी करू, की एचडीएफसी बँकेचे?
उत्तर : जी कंपनी पुढची अनेक वर्षे अस्तित्वात असणार आहे व प्रगती करीत राहणार आहे, अशाच कंपनीचे शेअर मंदीमध्ये किंवा स्टॉक एसआयपीद्वारे खरेदी करणे श्रेयस्कर ठरेल, असे वाटते. अनेक ब्रोकरेज संस्थांनी एचडीएफसी बँकेच्या शेअरसाठी रु. १९०० ते २००० असे ‘प्राइस टार्गेट’ दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.