नवी दिल्ली - सोन्या- चांदीच्या दरवाढीने मंगळवारी नवा उच्चांक गाठला. सोन्याच्या दरात विक्रमी दीड हजारांची वाढ झाली, तर चांदीही तीन हजारांनी महागली. देशभरात प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सुवर्णबाजारात सोने प्रतितोळा ५४ हजार ५०० वर पोचले तर चांदीनेही ‘भाव’ खात ६७ हजारांचा टप्पा गाठला. गेल्या चार महिन्यांपासून सोने- चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. दरम्यानचे काही दिवस सोडले तर ही दरवाढ सातत्यपूर्ण आहे. अवघ्या पाच महिन्यांत सोन्याच्या दरात प्रतितोळा सात हजारांची वाढ झाली असून चांदीतही आठ हजार रुपये भाववाढ झाली आहे. पुढच्या वर्षभरात सोन्याचा दर आणखी वाढेल त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच ठरू शकेल.
आज विक्रमी दरवाढ
गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात शंभर-दोनशे, पाचशेपर्यंत दरवाढ झाली. गेल्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात एकाच दिवसात हजार रुपये दरवाढीही झाली होती. आज मात्र, भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दराने विक्रमी उसळी घेतली. प्रति दहा ग्रॅममागे तब्बल हजार ते बाराशे रुपयांची वाढ झाली. चांदीच्या दरात प्रतिकिलोमागे तब्बल तीन हजार ते ३३०० रुपयांची वाढ झाली, चांदीतील ही आजवरची विक्रमी वाढ असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईत सोन्याचा दर 52 हजार 900 रुपये इतका असून दिल्लीत 54 हजार 600 तर कोलकात्यात 54 हजार 600 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका दर आहे.
वायदे बाजारातही सोन्याच्या दराचा उच्चांक
शिकागो मर्चंटाइल एक्सचेंजवर सोमवारी सप्टेंबर महिन्यासाठी सोन्याचे वायदे बाजारातील दर 1 हजार 950 डॉलर प्रति औंस इतके झाले होते. नऊ वर्षांपूर्वी याआधीचा उच्चांक नोंदवला होता. तज्ज्ञांच्या मते लवकरच हा भाव 2 हजार डॉलर्सच्या वर पोहोचण्याची शक्यता आहे. सीएमएक्सवर चांदीचे दरही 24 डॉलर प्रति औंस इतके होते. भारतात सोन्याचे दर 52 हजार रुपये 10 ग्रॅम झाले आहेत. तर चांदी 65 हजार रुपये प्रती किलोग्रॅम इतक्या दराने विक्री केली जात आहे.
सोन्याची किंमत 83 हजारांवर पोहोचण्याची शक्यता
गेल्या दोन वर्षांत सोन्याच्या गुंतवणुकीत वाढ झाली आहे. यातून चांगला रिटर्न मिळत असल्यानं ही गुंतवणूक वाढल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. गेल्या दोन वर्षांत सोन्याने 55 टक्के रिटर्न दिले आहेत. तर S & P 500 ने 11.3% रिटर्न दिले आहेत. दुसरीकडे सेन्सेक्स जुलै 2018 मध्ये जितका होता त्यापेक्षा आता कमीच आहे. बँक ऑफ अमेरिकेच्या सिक्युरिटीने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार 2021 अखेर सोन्याचे दर 3 हजार डॉलर होण्याची शक्यता आहे. भारतीय चलन आणि दर यानुसार तेव्हा सोन्याची किंमत भारतात 83 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी होऊ शकते.
सोन्याच्या किंमती कमी होतील का?
व्याज दर आणि सोन्याच्या किंमतीचा व्यस्त संबंध आहे. व्याज वाढलं की सोन्याची मागणी कमी होते आणि व्याज दर कमी झाले की सोन्याची मागणी वाढते. सध्या जगभरातील केंद्रीय बँकांनी आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी व्याजदर घटवले आहेत. भारतातही गेल्या वर्षभरात व्याज दर घटले आहेत. इक्विटी मार्केट घसरल्यानेही गुंतवणूकदारांनी सोन्यावर भर दिला आहे. याशिवाय बँकांकडून व्याजदर कमी केले आहेत. रिझर्व्ह बँकेने आणखी व्याज दर कमी केले तर याचा परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या किंमती कमी होऊ शकतात पण सध्या ही शक्यता कमी आहे. जर केंद्रीय बँकांनी आर्थिक संकटातून सुटका होण्यासाठी सोनं विकण्याचा निर्णय घेतला तर किंमती कमी होतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.