नकारात्मक आंतरराष्ट्रीय संकेतामुळे गेल्या आठवड्याच्या शेवटी ‘सेन्सेक्स’ने ५४९ अंशांची घसरण दर्शवून ४९,०३४ अंशांवर, तर ‘निफ्टी’ने १६१ अंशांची घसरण दर्शवून १४,४३३ अंशांवर बंद भाव दिला. येत्या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होतील. गुंतवणूकदारांना आता केंद्रीय अर्थसंकल्पाचे वेध लागले आहेत. आलेखानुसार आगामी कालावधीसाठी ‘सेन्सेक्स’ची ४४,९२३, तर ‘निफ्टी’साठी १३,१३१ ही महत्त्वाची आधार पातळी आहे. अर्थसंकल्पपूर्व कालावधीमध्ये ‘निफ्टी’ १५,००० ते १३,००० या पट्यातच चढ-उतार दाखविणे अपेक्षित आहे.
बाजारात सावधानतेचा इशारा
गुंतवणुकीचा प्रवास करताना एकूण शेअर बाजार किती स्वस्त किंवा महाग आहे, हे तपासणे आवश्यक असते. सर्वप्रथम गुंतवणूक गुरू वॉरेन बफे यांनी सांगितलेला इंडिकेटर ‘मार्केट कॅप टू जीडीपी रेशो’चा विचार करणे योग्य ठरू शकेल. समजा, एका शेअरची किंमत रु. १०० आहे आणि बाजारात त्या कंपनीचे १० शेअर आहेत, तर त्या कंपनीचे रु. १००० (१००*१०) ‘मार्केट कॅप’ झाले. शेअर बाजारातील सर्व कंपन्यांचे अशा प्रकारे ‘मार्केट कॅप’ काढून एकत्र केल्यास संपूर्ण शेअर बाजाराचा ‘मार्केट कॅप’ समजतो. ‘फॉर्च्युन’ मासिकाला २००१ मध्ये बफे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ज्या वेळेस देशाच्या एकूण शेअर बाजाराचा ‘मार्केट कॅप’ देशाच्या ‘जीडीपी’पेक्षा जास्त होतो, त्यावेळेस शेअर बाजार महाग होतो. देशाच्या ‘जीडीपी’च्या तुलनेत शेअर बाजाराचे ‘मार्केट कॅप’ दुप्पट झाल्यास शेअर बाजारात गुंतवणूक करणे म्हणजे आगीशी खेळण्यासारखे आहे. अर्थात अशा वेळेस शेअर बाजार खूप महाग झालेला असतो.
‘मार्केट कॅप टू जीडीपी’
भारतीय शेअर बाजार देखील ‘मार्केट कॅप टू जीडीपी’चा विचार करता महाग झाला आहे. कोरोना काळामुळे देशाच्या ‘जीडीपी’मध्ये घसरण झाल्याने हा तात्पुरता महाग झाला आहे. मात्र, कंपन्यांचे उत्पादन पूर्वपदावर आल्यावर ‘जीडीपी’चे आकडे वाढतील आणि ‘मार्केट कॅप टू जीडीपी’ प्रमाणे बाजार स्वस्त होऊ शकेल. मात्र, शेअर बाजार एकाच ठिकाणी स्थिर राहिला असता, तर असा विचार करणे योग्य होते. कोरोनापूर्व काळातच ‘जीडीपी’चे चक्र मंदावले होते. अशातच बाजार मोठ्या प्रमाणात वाढल्याने ‘जीडीपी’मध्ये सुधारणा होऊन देखील ‘सेन्सेक्स’ ४९ ते ५० हजार अंशांच्या पातळीनजीक असताना बाजार अपेक्षेइतका स्वस्त नाही.
‘प्राईस अर्निंग रेशो’
बाजाराचे मूल्यमापन करणारा दुसरा इंडिकेटर म्हणजे ‘प्राईस अर्निंग रेशो’ जो ४० या आकड्याच्या समीप जाऊन पोचला आहे. अर्थात रु. ४० गुंतवून रु. १ ची मिळकत म्हणजे बाजार केवळ २.५ टक्के परतावा देण्याची क्षमता दर्शवत आहे. निर्देशांकाच्या या ‘व्हॅल्युएशन’चा बँकेतील ठेवीदराशी तुलना केल्यास बाजार अत्यंत महाग आहे. आगामी एका वर्षात निर्देशांकातील कंपन्यांचे उत्पन्न दुपटीने वाढले, तरी बाजार आहे त्या पातळीला असताना मध्यम ‘व्हॅल्युएशन’ला पोचेल. अशा परिस्थितीत शेअर बाजार बराच काळ एका स्थिर पट्यात वर-खाली होणे किंवा बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण होण्याचा इतिहास आहे. मात्र, इतिहासाची पुनरावृत्ती न करता बाजार असाच वाढत राहून काही काळासाठी नवा इतिहास घडविणार आहे, असा विचार केल्यास दीर्घावधीमध्ये अतिरिक्त भाववाढीचा फुगवटा फुटून कंपन्यांच्या मिळकतीमधील वास्तविक वाढीप्रमाणे बाजार परतावा देणे अपेक्षित आहे. यामुळे ‘प्राईस अर्निंग रेशो’नुसार देखील सद्यःस्थितीमुळे शेअर बाजार महाग असल्याने मर्यादित गुंतवणूक करणेच योग्य ठरेल.
बाजार ‘बुक व्हॅल्यू’च्या चौपट
‘प्राईस टू बुक व्हॅल्यू’चा विचार करता बाजार ‘बुक व्हॅल्यू’च्या चौपट झाला आहे. अर्थात या परिमाणानुसार देखील शेअर बाजार महाग असल्याचे प्रतीत होत आहे. सध्या शेअर बाजाराचा ‘डिव्हिडंड यिल्ड रेशो’ हा एक टक्क्याच्या जवळ गेला आहे, म्हणजेच ‘निफ्टी’तील कंपन्यांची खरेदी केल्यास गुंतवणुकीवर वर्षात केवळ एक टक्का लाभांशरुपी परतावा मिळणार असल्याची आकडेवारी समोर येत आहे. अर्थात ‘डिव्हिडंड यिल्ड रेशो’चा विचार करता देखील शेअर बाजार अत्यंत महाग असल्याचे समजते. देशावरील एकूण कर्ज आणि देशातील एकूण उत्पादन याची आकडेवारीदेखील धोक्याची घंटा वाजवत आहे.
फंडामेंटली सक्षम कंपन्यांमध्ये करा गुंतवणूक!
एकीकडे बाजाराला अर्थसंकल्पाचे वेध लागले असताना विविध परिमाणांनुसार बाजार अत्यंत महाग असल्याचे लक्षात येत आहे. अशा वेळेस गुंतवणूकदारांनी ब्रिटानिया इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर, कॅम्स आदी उत्तम ‘रिटर्न ऑन एम्प्लॉईड कॅपिटल’; तसेच ‘रिटर्न ऑन इक्विटी’ मिळविणाऱ्या फंडामेंटली सक्षम कंपन्यांच्या शेअरमध्ये मर्यादितच गुंतवणूक करणे; तसेच शेअर बाजाराबरोबर सोन्यामध्येदेखील टप्प्याटप्प्याने खरेदी करणे हितावह ठरेल.
वरील लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. त्यामुळे व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच आवश्यक आहे.
(लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.