भित्यापोटी मंदीचा राक्षस!

फंडामेंटल्सप्रमाणे सक्षम; तसेच आगामी काळात व्यवसायवृद्धीची क्षमता आणि शक्यता असणाऱ्या अनेक कंपन्यांचे शेअरमध्ये देखील सध्या मोठ्या प्रमाणात घसरण होताना दिसत आहे.
Bhushan Godbole writes large drop in share market Social media Invest with restraint
Bhushan Godbole writes large drop in share market Social media Invest with restraintsakal
Updated on
Summary

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५२,७९३ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १५,७८२ अंशांवर बंद झाले होते. ऑक्टोबर २०२१ पासून ‘सेन्सेक्स’, तसेच ‘निफ्टी’ने उच्चांकापासून साधारणपणे १५ टक्के घसरण दर्शविली आहे. आगामी काळात आणखी घसरण होणार का? त्याचप्रमाणे आणखी किती घसरण होणार? असे प्रश्न अनेकांना सतावत आहेत.

फंडामेंटल्सप्रमाणे सक्षम; तसेच आगामी काळात व्यवसायवृद्धीची क्षमता आणि शक्यता असणाऱ्या अनेक कंपन्यांचे शेअरमध्ये देखील सध्या मोठ्या प्रमाणात घसरण होताना दिसत आहे. याची सोशल मीडियावर चर्चा होणे स्वाभाविक आहे. अशा वेळेस गुंतवणूकदारांनी दीर्घावधीसाठी संयम ठेऊन गुंतवणूक करणे आवश्यक आहे. दीर्घावधीमध्ये होऊ शकणाऱ्या व्यवसायवृद्धीच्या तुलनेत मुबलक प्रमाणात ‘मार्जिन ऑफ सेफ्टी’ असताना जोखीम लक्षात घेऊन भांडवलावर उत्तम परतावा मिळविणाऱ्या विविध कंपन्यांच्या शेअरमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे.

अशा प्रकारे यापूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर देखील संयम ठेऊन पुन्हा संधी ओळखून शक्य असल्यास गुंतवणूक करणे योग्य ठरू शकेल. केवळ शेअर बाजारात भाव घसरत आहेत, या भीतीपोटी मंदीच्या राक्षसाचा विचार करण्याऐवजी, ज्या कंपन्यांच्या शेअरमध्ये आपण गुंतवणूक करीत आहोत, त्या कंपन्यांची व्यवसायवृद्धीची क्षमता लक्षात घेऊन, शेअरच्या केवळ भावाऐवजी त्या कंपन्यांचा व्यवसाय पाहून गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

सध्या निफ्टी फंडामेंटल्सचा विचार करता २० ‘पीई’च्या आसपास ‘ट्रेड’ होत आहे. अशा वेळेस अनेक कंपन्यांचे शेअर दीर्घावधीतील व्हॅल्युएशनचा विचार करता उत्तम परतावा मिळू शकेल, अशा भावाला मिळत आहेत. आगामी काळात बाजारात आणखी घसरण झाल्यास बाजार आणखी स्वस्त व्हॅल्युएशनला येऊ शकतो. मात्र, घसरण होईलच याची खात्री बाळगून व्यवहार करण्याऐवजी सद्यःस्थितीतील संधी ओळखून गुंतवणूक करण्याचे नियोजन करणे फायदेशीर ठरू शकेल.

आलेखानुसार ‘निफ्टी’ १५,६७१ या महत्त्वाच्या आधार पातळीजवळ ‘ट्रेड’ होत आहे. या पातळीपासून बाजार पुन्हा उसळी घेऊ शकतो. मात्र, कालांतराने आगामी काळात १५,६७१ या आधार पातळीखाली बंद भाव दिल्यास किंमत व वेळेच्या चक्रानुसार ‘निफ्टी’ नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत १३,५०० ते १४,००० पर्यंत आणखी घसरण दर्शवू शकेल. तांत्रिक विश्लेषणानुसार, हा केवळ एक अभ्यास किंवा अंदाज आहे, जो चुकू शकतो.

एसबीआय कार्डस अँड पेमेंट सर्व्हिसेस

ही भारतातील ग्राहकांना क्रेडिट कार्ड वितरित करण्याच्या व्यवसायात कार्यरत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची ही उपकंपनी आहे. ही भारतातील दुसरी सर्वांत मोठी क्रेडिट कार्ड वितरणकर्ता म्हणून प्रसिद्ध आहे. ही कंपनी भारतातील १३० हून अधिक शहरांमध्ये कार्यरत आहे. जाहीर झालेल्या निकालानुसार, कंपनीच्या ‘एनपीए’मध्ये (नॉन परफॉर्मिंग ॲसेट) घट झाली आहे. को-ब्रँडेड कार्डस, डिजिटल पेमेंटचा वाढता वापर, कंपनीचा वाढता ग्राहकवर्ग; तसेच विविध प्रकारच्या सुलभ ईएमआयच्या स्वरूपात परतफेडीचा पर्याय आदी अनेक ग्राहककेंद्रीत बाबींचा विचार केल्यास भारतात या व्यवसायात मोठ्या प्रमाणात वृद्धी होऊ शकते. दीर्घावधीसाठी गुंतवणुकीच्या दृष्टीने या कंपनीच्या शेअरचा जरूर विचार करावा.

मोल्ड-टेक पॅकेजिंग

मोल्ड-टेक पॅकेजिंग ही लुब्रिकंट (वंगण), पेंट, फूड आणि इतर उत्पादनांसाठी इंजक्शन-मोल्डेड कंटेनरच्या निर्मितीमध्ये गुंतलेली आहे. पुरवठ्याची गुणवत्ता; तसेच विश्वासार्हतेचा सिद्ध ट्रॅक रेकॉर्ड यांमुळे ही कंपनी अग्रगण्य एशियन पेंट्स, कॅस्ट्रॉल, शेल, एचयूएल आदी प्रमुख कंपन्यांसाठी पसंतीचा पुरवठादार बनली आहे. इन-मोल्ड लेबल (आयएमएल) सजावटीची उत्पादने; तसेच भारतात क्यूआर कोडेड पॅकेजिंग उत्पादने सादर करणारी ही पहिली कंपनी आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर, कॅडबरी, पेप्सी, एशियन पेंट्स, बर्जर पेंट्स, डाबर, नेस्ले, अमूल, ब्रिटानिया आदी अनेक नामवंत कंपन्यां मोल्ड-टेक पॅकेजिंग या कंपनीच्या ग्राहकवर्गात समाविष्ट आहेत. कंपनीला गल्फ ऑइल लुब्रिकंट्स इंडियाकडून क्यूआर कोडेड पॅकेजिंग कंटेनरसाठी नवी ऑर्डर मिळाली आहे.

पुढील दोन वर्षांत साधारणपणे ११ टक्के उत्पादनक्षमतावाढ ,फार्मा पॅकेजिंगमध्ये नवे लाँच; तसेच विद्यमान ग्राहकांकडून नव्या ऑर्डरमुळे दीर्घावधीमध्ये महसूल वाढवणे अपेक्षित आहे. सध्या कच्च्या मालाच्या महागाईमुळे दरवाढ झाल्याने मार्जिनवर अर्थात नफ्यावर परिणाम होत असला तरी आगामी काळात आवश्यकतेनुसार भाववाढ करून अपेक्षित फायदा मिळविण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याबाबत कंपनीच्या व्यवस्थापनाने तयारी केलेली दिसते. कंपनीने विक्री; तसेच नफ्यामध्ये सातत्याने वाढ दर्शवत व्यवसायवृद्धी केली आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास दीर्घावधीमध्ये उत्तम परतावा मिळू शकतो.

कोणत्या शेअरचा विचार करावा?

सध्या दीर्घावधीसाठी पोर्टफोलिओमध्ये एचडीएफसी बँक (शुक्रवारचा बंद भाव रु. १२९१), टीसीएस (शुक्रवारचा बंद भाव रु. ३४१४), एसबीआय कार्डस अँड पेमेंट सर्व्हिसेस (शुक्रवारचा बंद भाव रु. ७१५), मोल्ड-टेक पॅकेजिंग (शुक्रवारचा बंद भाव रु. ७०५) आदी कंपन्यांच्या शेअरमध्ये; त्याचप्रमाणे मर्यादित प्रमाणात सोन्यामध्ये किंवा ‘गोल्ड बीज’मध्ये देखील (शुक्रवारचा बंद भाव रु. ४३.४७) गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार करणे फायदेशीर ठरू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.