आगामी काळात महागाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ करण्याची पावले उचलली जाऊ शकतात...
गेल्या आठवड्यात अमेरिकी शेअर बाजाराचा निर्देशांक ‘डाऊ जोन्स’ने एकाच दिवसात तब्बल ८८० अंशांची पडझड करून ३१,३९२ अंशांवर बंद भाव दिला होता. ‘डाऊ जोन्स’ने मोठ्या प्रमाणात घसरण दर्शविली असल्याने या आठवड्याच्या प्रारंभी आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतीय शेअर बाजारांसाठी नकारात्मक संकेत मिळू शकतात. आगामी कालावधीसाठी ‘सेन्सेक्स’ची ५२,२६०, तसेच ‘निफ्टी’ची १५,६७० ही महत्त्वाची आधार पातळी आहे. आलेखानुसार, आगामी काळात १५,६७० या आधार पातळीखाली ‘निफ्टी’ने बंद भाव दिल्यास आणखी पडझड होण्याचे संकेत मिळू शकतात.
गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५४,३०३ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १६,२०१ अंशांवर बंद झाले होते. जागतिक पातळीवर नकारात्मक संकेत मिळाल्याने गेल्या शुक्रवारी ‘सेन्सेक्स’ने १०१६ अंशांची, तसेच ‘निफ्टी’ने २७६ अंशांची घसरण करून ‘ब्लॅक फ्रायडे’ची नोंद केली. अमेरिकेत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, सध्या महागाईच्या दराने ४० वर्षांतील उच्चांक नोंदविला आहे. आगामी काळात महागाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ करण्याची पावले उचलली जाऊ शकतात, या भीतीने गेल्या आठवड्यात शुक्रवारी अमेरिकी शेअर बाजाराचा निर्देशांक ‘डाऊ जोन्स’ने एकाच दिवसात तब्बल ८८० अंशांची पडझड करून ३१,३९२ अंशांवर बंद भाव दिला होता. ‘डाऊ जोन्स’ने मोठ्या प्रमाणात घसरण दर्शविली असल्याने या आठवड्याच्या प्रारंभी आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतीय शेअर बाजारांसाठी नकारात्मक संकेत मिळू शकतात. आगामी कालावधीसाठी ‘सेन्सेक्स’ची ५२,२६०, तसेच ‘निफ्टी’ची १५,६७० ही महत्त्वाची आधार पातळी आहे. आलेखानुसार, आगामी काळात १५,६७० या आधार पातळीखाली ‘निफ्टी’ने बंद भाव दिल्यास आणखी पडझड होण्याचे संकेत मिळू शकतात.
सध्या आलेखानुसार ‘निफ्टी’ नकारात्मक कल दर्शवत असल्याने, जोपर्यंत आलेखानुसार सक्षम तेजीचे संकेत मिळत नाहीत, तोपर्यंत अल्पावधीसाठी ‘ट्रेडर्स’नी व्यवहार करण्याची गडबड करू नये. दीर्घपल्ल्याची गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मात्र शेअर बाजारातील पडझड म्हणजे उत्तम व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणुकीची संधीच असते. दीर्घावधीसाठी गुंतवणूक करताना एकदम सर्व गुंतवणूक करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने संधी ओळखून गुंतवणूक करणे आणि संयम ठेवणे फायदेशीर ठरते. ट्रेडर्ससाठी दिशा ओळखून खरेदी-विक्रीची संधी लक्षात घेत, ‘ट्रेंड इज युअर बेस्ट फ्रेंड’ म्हणत ज्याप्रमाणे ‘विकेल तो टिकेल’ धोरण योग्य ठरू शकते, त्याचप्रमाणे दीर्घपल्ल्याची गुंतवणूक करताना उत्तम व्यवसाय करणाऱ्या विविध कंपन्यांच्या शेअरमध्ये दीर्घावधीतील व्यवसायवृद्धीची क्षमता लक्षात घेऊन ‘थांबला तो जिंकला’ हे धोरण स्वीकारणे फायदेशीर ठरू शकते. बाजारात मंदीचे वातावरण असताना फंडामेंटल्सनुसार सक्षम कंपन्यांच्या शेअरचे भाव देखील मोठ्या प्रमाणात घसरताना दिसतात. मात्र, अशा वेळेस दीर्घावधीतील प्रगतीच्या दृष्टीने वाढीची शक्यता लक्षात घेऊन संयम ठेवणे आवश्यक असते.
दीर्घपल्ल्याची गुंतवणूक करताना बाजारात सतत खरेदी-विक्री करण्यापेक्षा सध्या दीर्घावधीसाठी आपल्या पोर्टफोलिओमध्ये एचडीएफसी बँक (शुक्रवारचा बंद भाव रु. १३५१), टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (शुक्रवारचा बंद भाव रु. ३३५९), टेक महिंद्रा (शुक्रवारचा बंद भाव रु. १११०) आदी कंपन्यांच्या शेअरचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा. त्याचप्रमाणे दीर्घावधीची गुंतवणूक करताना तेजी-मंदीच्या लाटेत भांडवलावर उत्तम परतावा मिळविणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये संयम ठेऊन ‘थांबला तो जिंकला’, हा मंत्र लक्षात घेणे हितावह ठरू शकेल.
टेक महिंद्रा (टेक एम) (शुक्रवारचा बंद भाव रु. १११०)
टेक महिंद्रा ही भारतातील पाच दिग्गज आयटी कंपन्यांपैकी एक आहे. दूरसंचार सेवा प्रदाता, सॉफ्टवेअर विक्रेते, सिस्टीम इंटिग्रेटर; तसेच दूरसंचार उपकरणे उत्पादकांसाठी ही कंपनी आयटी, अभियांत्रिकी, संशोधन आणि विकास सेवा प्रदान करते. क्लाउड काँप्युटिंग, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, मशिन लर्निंग, डेटा विश्लेषण, नेटवर्क सेवा, चाचणी सेवा, कार्यप्रदर्शन अभियांत्रिकी, सुरक्षा आणि जोखीम व्यवस्थापन सेवा, व्यवसाय प्रक्रिया सेवा, उत्पादन अभियांत्रिकी, सल्लामसलत आदींसारख्या पुढच्या जनरेशन सेवांसह कंपनी विविध प्रकारच्या आयटी सेवा प्रदान करीत आहे. टेक महिंद्रा ही कंपनी बँकिंग आणि वित्तीय सेवा, रिटेल, मॅन्युफॅक्चरिंग आदींसारख्या क्षेत्रांमध्ये देखील आयटी सेवा प्रदान करीत आहे. ९० पेक्षा अधिक देशांमध्ये एक लाख २५ हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांसह कंपनीची जागतिक उपस्थिती आहे. टेक महिंद्रा ही कंपनी अनेक फॉर्च्युन ५०० कंपन्यांसह एक हजारांपेक्षा अधिक ग्राहकांना सेवा देते.
कम्युनिकेशन, मॅन्युफॅक्चरिंग, बँकिंग, वित्तीय सेवा ऑटोमोबाईल यांसारख्या क्षेत्रांमध्ये सध्या अनिश्चितता असूनही, या कंपनीला अनेक मोठे सौदे मिळाले आहेत. कंपनीने सूचित केल्यानुसार, आर्थिक वर्ष २३ मध्ये कंपनी अधिग्रहण थांबवतील आणि अधिग्रहित मालमत्तेच्या एकत्रिकरणाकडे लक्ष केंद्रित करतील. आगामी काळात भारती एअरटेल आणि टेक महिंद्रा यांनी ५जी इनोव्हेशन लॅब साठी धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. आगामी काळात कम्युनिकेशन क्षेत्रात होणारी प्रगती कंपनीच्या वाढीस पोषक ठरू शकेल, असे देखील कंपनीने सूचित केले आहे. कर्जाचे प्रमाण कमी ठेऊन ही कंपनी गुंतविलेल्या भांडवलावर २० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत व्यवसायात प्रगती करीत आहे. दीर्घावधीतील व्यवसायवृद्धीची क्षमता लक्षात घेता, टेक महिंद्रा या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घावधीच्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.