शेअर मार्केट : शेअरची बास्केट!

शेअर बाजारात नियोजनबद्ध पद्धतीने मासिक तत्वावर गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार ज्याप्रमाणे म्युच्युअल फंडात ‘एसआयपी’मार्फत गुंतवणूक करू शकतात.
Share Market
Share MarketSakal
Updated on

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५८,७८६ अंशांवर, तसेच ‘निफ्टी’ १७,५११ अंशांवर बंद झाला. सद्यःस्थितीतील अल्पकालीन अनिश्चितता लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात झालेल्या पतधोरण समितीच्या आढावा बैठकीत अर्थव्यवस्थेला अनुकूल धोरण स्वीकारत व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याच्या निर्णय घेतला. ‘ॲम्फी’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर महिन्यात म्युच्युअल फंडामार्फत शेअर बाजारात ‘एसआयपी’च्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीचा ओघ मासिक तत्वावर प्रथमच ११ हजार कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे.

शेअर बाजारात नियोजनबद्ध पद्धतीने मासिक तत्वावर गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार ज्याप्रमाणे म्युच्युअल फंडात ‘एसआयपी’मार्फत गुंतवणूक करू शकतात, त्याचप्रमाणे शेअर ब्रोकरकडे स्वतः डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडून देखील गुंतवणूकदार उत्तम कंपन्यांच्या शेअरमध्ये मासिक तत्वावर नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवणूक करू शकतात. अशा नियोजनबद्ध पद्धतीने फंडामेंटल्सनुसार सक्षम कंपन्यांच्या शेअरच्या थैली किंवा बास्केटमध्ये दीर्घावधीसाठी मासिक तत्वावर थेट गुंतवणूक करून देखील उत्तम फायदा मिळू शकतो. मात्र, अशी गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराने मासिक तत्वावर स्वतःकडे उपलब्ध असलेल्या भांडवलाचे प्रमाण आणि जोखीम लक्षात घेऊनच गुंतवणूक करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी या महिन्यात कोणत्या कंपन्यांच्या शेअरचा विचार करणे फायदेशीर ठरू शकेल, ते पाहू.

‘टीटीके प्रेस्टिज’ गुंतवणूकयोग्य

‘जो बीवी से करे प्यार, वो प्रेस्टिज से कैसे करे इन्कार,’ असे म्हणत घराघरात लोकप्रिय झालेल्या प्रेस्टिज प्रेशर कूकर आणि किचनवेअरची टीटीके प्रेस्टिज लि. ही निर्माती आणि वितरक कंपनी आहे. ही कंपनी भारतातील सर्वांत मोठी किचनवेअर कंपनी आहे. २०२१ मधील उपलब्ध आकडेवारीनुसार, एकूण महसुलापैकी प्रेशर कुकरमधून ही कंपनी साधारण ३१ टक्के, कूकवेअरमधून १५ टक्के, गॅस स्टोव्हमधून १४ टक्के, मिक्सर-ग्राइंडरमधून १२ टक्के आणि उर्वरित महसूल इतर स्वयंपाकघर आणि घरगुती उपकरणांच्या विक्रीतून मिळवीत आहे. कर्जाचे प्रमाण अत्यल्प ठेऊन ही कंपनी व्यवसायात गुंतविलेल्या भांडवलावर उत्तम परतावा मिळवत आहे. देशांतर्गत आणि निर्यात मागणी पूर्ण करण्यासाठी या कंपनीने गुजरातमधील कारखान्याच्या वार्षिक उत्पादनक्षमतेत वाढ केली आहे. गेल्या शुक्रवारी या कंपनीच्या शेअरने रु. १०,९९३ ला बंद भाव दिला आहे. कंपनीने रु. १० प्रति शेअरचे प्रत्येकी रु. १ असे विभाजन करण्याच्या उद्देशाने ‘स्टॉक स्प्लिट’साठी १५ डिसेंबर २०२१ ही तारीख निश्चित केली आहे. एक्स-डेट (१४ डिसेंबर २०२१) रोजी शेअरची किंमत शेअरच्या बाजारभावाच्या एक दशांशपर्यंत कमी होईल. या महिन्यात ‘स्टॉक स्प्लिट’नंतर या शेअरमध्ये दीर्घावधीच्या दृष्टीने भांडवलाचे प्रमाण आणि जोखीम लक्षात घेऊन गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकेल.

प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट

सणासुदीच्या काळात वाहनविक्रीत वाढ होण्याची आशा होती. मात्र, ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स’ने (सियाम) दिलेल्या माहितीनुसार, सध्या सेमीकंडक्टरच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे प्रवासी वाहनांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. नोव्हेंबरमध्ये प्रवासी वाहन विक्रीच्या आकडेवारीने गेल्या सात वर्षांतील नीचांक गाठला आहे. मात्र, मागील लेखांमध्ये नमूद केल्यानुसार सेमीकंडक्टरच्या अपुऱ्या पुरवठ्याचे संकट हे कायमस्वरुपी टिकणारे संकट नसून, तात्पुरते संकट आहे. यामुळे वाहनविक्री क्षेत्राशी निगडित फंडामेंटली सक्षम कंपन्यांच्या शेअरमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे देखील फायदेशीर ठरू शकेल. सुप्रजीत इंजिनिअरिंग (रु ४१६), फिएम इंडस्ट्रीज (रु. ११७६), एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज (रु. १७८९) आदी वाहननिर्मिती क्षेत्राशी निगडित कंपन्यांच्या शेअरचा गुंतवणूकदारांनी दीर्घावधीसाठी जरूर विचार करावा.

या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()